भारतीय शास्त्रीय संगीत देते मनाला शांतता

दिवसभरात १५ मिनिटे भारतीय शास्त्रीय संगीताचा आनंद घेतला गेला तर मन रिलॅक्स होण्यास मोठीच मदत मिळत असल्याचे तसेच रक्तदाब, पल्स रेटही लक्षणीय रित्या आटोक्यात येत असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या बायोफिजिक्स विभागाने केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. या प्रयोगासाठी २० ते ३० वयोगटातील ४० लोकांची निवड करण्यात आली होती.

आजकालच्या तरूणांची बदललेली जीवनशैली जीवनातील ताणतणाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असून त्यामुळे तरूण वयातच या लोकांना अनेक दुर्घर आजारांचा सामना करावा लागत आहे. हृदयविकार, मानसिक अशांतता, विस्कळीत झोप असे अनेक विकार यामुळे होत असून त्यावर कोणती उपाययोजना उपयुक्त ठरेल यासाठी हा प्रयोग करण्यात आला. या लोकांना दिवसातली फक्त पंधरा मिनिटे भारतीय वाद्य संगीत ऐकविण्यात आले तेव्हा त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे पल्स रेट कमी झाल्याचे तसेच मेंदू अॅक्टिव्हिटीतही बदल झाल्याचे जाणवले.

ईईजी (इलेक्ट्रोएनसेलोग्राम) च्या सहाय्याने हे आलेख काढले गेले. मेंदूतील कॉर्टेक्स भागातील चार लहरींच्या पॅटर्नवरून ही निरीक्षणे नोंदविली गेली. त्यात अल्फा वेव (जागृती पण रिलॅक्सपणा) बीटा वेव्ह ( तल्लख व जागरूक) तर थिटा व डेल्टा वेव्ह( अगदी कमी फ्रि क्वेन्सी) या पद्धतीने ही निरीक्षणे घेतली गेली. प्रयोगात सामील झालेल्या सर्व चाळीस जणांच्यात हे बदल जाणवले. प्रमुख संशोधक मार्टिना डेव्हीड यांच्या मते पल्स कमी होणे व रक्तदाब कमी होणे याचा अर्थच मन शांत असणे असा आहे. या संशोधनाचे अधिक तपशील अद्याप जाहीर केले गेलेले नाहीत कारण त्यावरचा पेपर प्रसिद्ध केला जाणार आहे.

याच पद्धतीने भारतीय शास्त्रीय संगीत मानसिक आजार असलेल्यांनाही उपयुक्त ठरू शकतील का हा या प्रयोगाचा पुढचा टप्पा असल्याचे विभागप्रमुख प्रो. पी.एम.डोंगरे यांनी सांगितले. अनेक प्रकारचे मानसिक आजार, डिप्रेशन, फिटस येणे, झोपेचे त्रास यावरही ही थेरपी उपयोगी ठरू शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment