स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम होत असल्यामुळे या कंपनीने थांबवल्या कोरोना लसीची चाचणी


वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी संशोधक अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यातच अनेक कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या जगभरात सुरु आहेत. जगातील इतर कंपन्यांप्रमाणे अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननेही कोरोना प्रतिबंधक लस तयार केली आहे. पण या लसीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. कारण लसीमुळे स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढली आहे. सध्या या लसीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. प्रायोगिक लसीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये कोरोना विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली. स्वयंसेवकांच्या शरीरावर जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही कुठलेही दुष्परिणाम दिसले नसल्यामुळे ही लस कोरोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे.

लस प्रभावी ठरली जात असतानाच अचानक लसीच्या चाचण्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने थांबवल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार त्याला जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. कोरोना लसीच्या चाचणीमध्ये सहभागी असलेल्या काही स्वयंसेवकांना अचानक आजारपण आल्यामुळे या चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्याचे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आले आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनद्वारा विकसित केलेल्या लसीचे वैशिष्टय म्हणजे या लशीचा एक डोसही कोरोनापासून रक्षण करण्यासाठी पुरेसा आहे. तर दुसरीकडे मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. जर कोरोना लसीचा एक डोस पुरेसा ठरला, तर वितरणापासून अनेक गोष्टी आणखी सुलभ होऊ शकतात. ६० हजार स्वयंसेवकांवर कंपनीने लसीची चाचणी केली असून, या लशीचा एक डोस परिणामकारक ठरू शकतो, हे या चाचण्यांमधून दिसून आले आहे.