टाटा ग्रुपच्या मालकीच्या तनिष्क या ब्रॅण्डची नवी जाहिरात वादाच्या भोवऱ्यात, लव्ह जिहादचा प्रसार केल्याचा आरोप


मुंबई – या महिन्यापासून देशभरात सुरु होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी प्रेक्षकांना नवीन जाहिरातींच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण सध्या टाटा ग्रुपच्या मालकीच्या दागिण्यांच्या तनिष्क या ब्रॅण्डची नवी जाहिरात वादात सापडली आहे. या जाहिरातीमध्ये दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींच्या लग्नासंदर्भातील भाष्य करण्यात आल्यामुळे या जाहिरातीसंदर्भात सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. या जाहिरातीमध्ये एक हिंदू तरुणी लग्न करुन मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्यानंतर बारश्याच्या कार्यक्रमामधील गोष्ट दाखवण्यात आली आहे. पण अनेकांनी हा लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत सोशल मीडियावरुन #BoycottTanishq ची हाक दिल्यानंतर ही वादग्रस्त जाहिरात कंपनीने मागे घेतली आहे.

या जाहिरातीमध्ये मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न करुन गेलेल्या हिंदू तरुणीसाठी तिच्या सासरचे लोक हिंदू प्रथांप्रमाणे बारसे करण्याचा निर्णय घेतात असे दाखवण्यात आले आहे. यासंदर्भात तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे लग्न आपल्या मुलीप्रमाणे सुनेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये झाले आहे. ज्या गोष्टी सामान्यपणे कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेते. त्याचबरोबर या जाहिरातीमध्ये दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ साधण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पण ही जाहिरात अनेकांच्या पचनी पडलेली नाही. लव्ह जिहादला या जाहिरातीमधून प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांद्वारे आंतर-धार्मिक विवाहासाठी लव्ह जिहाद हा शब्द वापरला जातो. त्यांच्या म्हणण्यानुसार की मुस्लिम पुरुषाशी लग्न करण्यासाठी बळजबरीने किंवा छळ करून स्त्रियांचे धर्मांतरण होते. महिलांना या सर्व घटनांनामध्ये धर्मांतर करून लग्न करण्यास भाग पाडल्याचा दावा केला जातो. हिंदू मुलींनी केरळ आणि कर्नाटकमध्ये मुस्लिम तरुणांशी लग्न केल्याचे प्रकार काही वर्षापूर्वी समोर आले, तेव्हापासून लव्ह जिहादचा वापर पहिल्यांदा करण्यात आला होता. ही जाहिरात म्हणजे लव्ह जिहादचाचा प्रकार असल्याचा आरोप करत अनेकांनी तनिष्कवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरुन केली आहे.