तनिष्कच्या जाहिरातीवरुन संतापली कंगना राणावत


टाटा ग्रुपच्या मालकीच्या तनिष्क या ब्रॅण्डच्या जाहिरातीवरुन सध्या सोशल मीडियावर वाद सुरु असून या जाहिरातीमध्ये दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींच्या लग्नासंदर्भातील भाष्य करण्यात आल्यामुळे या जाहिरातीवरुन सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. या जाहिरातीमध्ये दाखवण्यात एक हिंदू तरुणी लग्न करुन मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्यानंतर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामधील गोष्ट आली आहे. पण ही जाहिरात लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन #BoycottTanishq ची हाक दिल्यानंतर ही वादग्रस्त जाहिरात कंपनीने मागे घेतली आहे. पण हे प्रकरण त्यानंतरही शांत झालेले नाही. आता ही जाहिरात अनेक अर्थांनी चुकीचे असल्याचे अभिनेत्री कंगना राणावतने म्हटले आहे.


या जाहिरातीबाबत आपले मत व्यक्त कंगणा म्हणाली की, जाहिराती ची संकल्पना वाईट नसली तरी ती अयोग्य पद्धतीने मांडली आहे. एक हिंदू मुलगी आपल्या श्रद्धांचा स्वीकार केल्याने घाबरत आपल्या सासरच्या व्यक्तींसमोर वावरते. घरातील ती सदस्य नाही का? ती त्यांच्यावर अवलंबून आहे असे का दाखवण्यात आले आहे? स्वत:च्या घरात तिला असे परके का वाटत आहे?, हे लज्जास्पद असल्याचे कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


अनेक पद्धतीने ही जाहिरात चुकीची वाटते. मागील बऱ्याच काळापासून हिंदू सून तिच्या सासरच्या लोकांबरोबर राहत आहे, पण ती जेव्हा त्यांना वंशाचा दिवा देणार असे सांगते तेव्हा तिचा स्वीकार केला जातो. ती फक्त मुलाला जन्म देण्यासाठी आहे? ही जाहिरात केवळ लव्ह जिहाद नाही तर लिंगभेदाचेही समर्थन करते, असे कंगनाने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


त्याचबरोबर आपल्या शेवटच्या आणि तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एक हिंदू म्हणून हे क्रिएटीव्ह टेररिस्ट आपल्या मनामध्ये काय टाकत असतात याबद्दल आपण जागृक रहायला हवे. आपण याबद्दल विचारपूर्वक चर्चा करायला हवी आणि त्यानंतर आपल्याला काही ठराविक विचार करायला भाग पाडले जाते का याचा विचार करायला हवा. आपली संस्कृती वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.