बिहारमधील नऊ नेत्यांची भाजपने सहा वर्षासाठी केली हकालपट्टी


पाटना – बिहार विधानसभा निवडणुकीची घटीका जसजशी जवळ येऊ लागली असतानाच तेथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा ऑनलाईन प्रचार देखील सुरू झाला असून, जवळपास सर्वच पक्षांनी आपआपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपमधील बंडखोरी उफाळून आली आहे. एनडीएच्या उमेदवारांविरोधातच नऊ नेत्यांनी दंड थोपटल्याने त्या नेत्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.


भाजपकडून बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. भाजपसोबत यावेळी जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक लढवत आहेत. पण एनडीएतील जागावाटपात अनेक जागा जदयू व मित्रपक्षांकडे गेल्यामुळे भाजपमधील अनेक इच्छुक नेते नाराज झाले आहेत. आता नाराज झालेल्या नेत्यांनी बंडखोरी केली असून, एनडीएच्या उमेदवारांविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या नऊ बंडखोर नेत्यांववर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने कारवाई केली आहे. या नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.