कलम ३७० बाबत अब्दुल्ला यांच्या विधानाचा भाजपकडून विपर्यास: नॅशनल कॉन्फरन्स


नवी दिल्ली: कलम ३७० पुनरुज्जीवित करून काश्मिरची स्वायत्तता कायम ठेवण्यासाठी चीनची मदत घेणार असल्याचे विधान फारुख अब्दुल्ला यांनी कधीही केलेले नाही. त्यांच्या विधानाचा भारतीय जनता पक्षाने विपर्यास केला आहे, अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सच्या वतीने करण्यात आली.

चीनच्या मदतीने काश्मीरला पुन्हा स्वायत्तता मिळवून देणार असल्याचे विधान अब्दुल्ला यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. संसदेत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार अब्दुल्ला यांना हे वक्तव्य अशोभनीय आहे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्याकडून या आरोपाचा इंकार केला आहे.

अब्दुल्ला यांनी चीनची मदत घेणार असल्याचे सांगितले नाही. काश्मीर ची स्वायत्तता काढून घेण्याचा निर्णय चीनला पसंत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आपण चीनच्या अध्यक्षांना निमंत्रण दिले नाही. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना बोलावून त्यांच्यासह झुले झुलवले आणि मेजवानी दिली, असे अब्दुल्ला म्हणाले, असे नॅशनल कॉन्फरन्स च्या प्रवक्त्याने सांगितले. काश्मीर स्वायत्त ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या संघर्षात चीन मदत करू शकतो एवढेच त्यांचे म्हणणे आहे, असे स्पष्टीकरण नॅशनल कॉन्फरन्सने दिले आहे.