अमूलनेही हटवल्या ‘रिपब्लिक’वरील जाहिराती


मुंबई – आता जाहिरात कंपन्यांनी टीआरपी घोटाळ्यात नाव आलेल्या चॅनेल्सला दणका द्यायला सुरुवात केली असून नुकतेच ‘रिपब्लिक’सह काही चॅनेल्सवरच्या आपल्या जाहिराती बजाज ऑटोने बंद केल्यानंतर आता पारले-जी पाठोपाठ दुग्धजन्य पदार्थ उत्पादक अमूलनेही या वादग्रस्त चॅनेल्सवरील आपल्या जाहिराती बंद करायचे ठरवले आहे. या निर्णयाबद्दल त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघड केल्यानंतर मोठमोठय़ा कंपन्या सावध झाल्या आहेत. या चॅनेल्सवरील जाहिराती थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. समाजात द्वेष पसरवणाऱ्या कंटेंटचा निषेध केला आहे. पारले जी प्रोडक्टचे मार्केटींग हेड कृष्णराव बुद्ध यासंदर्भात म्हणाले, सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कटेंट प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर आमच्या कंपनीकडून जाहिरात प्रसारित करण्यात येणार नाही. आमच्या या निर्णयाचे स्वागत करून इतरही कंपन्यांनीही याचे अनुकरण करावे. या निर्णयामुळे टिव्ही चॅनेल्स त्यांच्या कंटेंटमध्ये बदल करतील, अशी अपेक्षाही कृष्णराव बुद्ध यांनी व्यक्त केली आहे.

तर वादग्रस्त चॅनेल्सवरील जाहिरातींबाबत अमूल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनीही पुनर्विचार करण्यास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या जाहिरातींसाठी वृत्तवाहिन्या महत्त्वाचे माध्यम आहेत. पण जर वाहिन्यावर सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित होत असेल तर अमूल कंपनी अशा वर्तणुकीविरोधात वाहिन्यांवर दबाव आणू शकते, असे म्हणत सोधी यांनी जाहिराती हटवण्याचे संकेत दिले.