नेहानंतर बोहल्यावर चढणार आदित्य नारायण


बॉलीवूडमध्ये अल्पवधीतच यशाच्या शिखरावर पोहचणारी प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंह याच्यासोबत लग्न करणार असल्याची कबुली दिली. पण तत्पूर्वी नेहा आणि गायक आदित्य नारायण यांच्या अफेअरच्या चर्चा इंडियन आयडलच्या सेटवर रंगल्या होत्या. पण आता नेहानंतर आदित्य देखील विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती खुद्द आदित्यने दिली आहे.

आदित्यने नुकतीच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीमध्ये त्याने आपण लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले आहे. या वर्षाच्या शेवटी आदित्य गर्लफ्रेंड, अभिनेत्री श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे. मी कधीच माझे नाते गुपित ठेवलेले नाही. पण एक वेळ अशी आली की आमच्याबद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही यावर न बोलण्याचा विचार केला होता, असे आदित्य म्हणाला.

त्यानंतर त्याची आणि श्वेताची ओळख कुठे आणि कशी झाली हे त्याने सांगितले आहे. माझी आणि श्वेताची ओळख शापित चित्रपटाच्या सेटवर झाली. आमच्यामध्ये सुरुवातीला मैत्रीचे नाते होते आणि आमच्या करिअरवर आम्हाला लक्ष द्यायचे होते. आमच्या आयुष्यात गेल्या १० वर्षात अनेक चढ-उतार आले. आम्ही येत्या डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहोत. श्वेता माझ्या कुटुंबीयांना आवडते, असे आदित्यने आवर्जुन सांगितले.

प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा आदित्य हा मुलगा आहे. तो देखील गायक आणि अभिनेता असून रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे त्याने सूत्रसंचालन केले आहे. नेहा कक्कर त्याचवेळी शोमध्ये परिक्षक म्हणून काम करत होती. त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नेहाने वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला होता. आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.