रशियाचे अतिवेगवान सोयुझ तीन तासात आयएसएसवर पोहोचणार

फोटो साभार झी न्यूज

रशिया अंतराळातील एका खास कामगिरीसाठी आता सज्ज झाले असून येत्या १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४५ मिनिटाने रशियाचे सुपरफास्ट सोयुझ एमएस -१७ हे अंतराळयान तीन अंतराळविरांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावत आहे. विशेष म्हणजे सोयुझ एमएस १७ हे यान केवळ तीन तासात म्हणजे मास्को लंडन विमान प्रवासाला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. अंतराळवीराना घेऊन या वेगाने हा प्रवास करणारे सोयुझ पहिलेच अंतराळ यान आहे.

या अंतराळयानातून तीन अंतराळवीर जाणार आहेतच पण त्याशिवाय अंतराळ स्थानकात अगोदरच गेलेल्या अंतराळवीरासाठी काही सामान सुद्धा यातून नेले जाणार आहे. हे यान पुढच्या वर्षी ९ एप्रिल रोजी पृथ्वीवर परत येईल असे समजते.

यान इतक्या प्रचंड वेगाने जाण्यासाठी त्यात अल्ट्राफास्ट टू ओर्बिट फ्लाईट प्लानचा वापर केला गेला आहे. काझाकीस्थान मधील बायकोनूर लाँचिंग स्टेशनवरून सोयुझ एमएस १७ झेपावेल. रशियाचा पाहिला अंतराळवीर युरो गागरीन याने याच लाँचिंग स्टेशनवरून अंतराळात पाहिले यशस्वी उड्डाण केले होते. सोयुझ एमएस १७ उड्डाणाचे नेतृत्व क्रू कमांडर सर्गेई रीझीकोव्ह करणार आहे. या प्रवासात ही टीम दोन वेळा बाहेर येऊन सिस्टीम मॅनेजमेंट व भविष्यातील स्पेस वॉकसाठी एअर लॉक लावणार आहे.

सोयूझ एमएस १७ अंतराळ स्थानकाला जोडले जावे म्हणून अंतराळ स्थानकाची उंची १.७ किमीने कमी केली जाणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ३ तास ४० मिनिटात मानवरहित अंतराळ यानाने अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचण्याची कामगिरी केली होती.