उगवत्या सूर्याच्या देशात लाकडी पेटीत बंद गणेश मूर्ती

गणपती किंवा गणेश ही बुद्धीची देवता. भारतात प्रथम पूजेचा मान गणरायाला दिला जातो. हिंदूंची ही देवता जगातील अन्य देशात सुद्धा मनोभावे पुजली जाते. थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, जपान अश्या अनेक देशात गणेश मंदिरे आहेत. जपान म्हणजे उगवत्या सूर्याचा देश. येथे मात्र आठव्या शतकात बांधल्या गेलेल्या मात्सुचीयाना शोतेन येथील अतिप्राचीन मंदिरात गणेश मूर्ती एका सुशोभित लाकडी पेटीत ठेवली जाते आणि विशेष प्रसंगी बाहेर काढली जाते. ही गणेश मूर्ती म्हणजे गणेशाचे जपानी व्हर्जन म्हणता येईल.

जपान मध्ये मुख्य धर्म बौद्ध आहे त्यामुळे येथे अनेक बौद्ध मंदिरे आहेत. वरील मंदिरातील गणेशाची पूजा प्रामुख्याने मंत्र तंत्र मानणारे बौद्ध भाविक करतात. धर्म संशोधक म्हणतात, आठव्या शतकात प्रथम जपान मध्ये या मूर्तीला गणेश मानले जाऊ लागले. मंत्र तंत्र पूजा करणाऱ्या बौद्ध धर्माची एक शाखा आहे त्यात तंत्र शक्तीची पूजा केली जाते. ही शाखा ओडिसा मधून चीन मध्ये आणि चीन मधून जपान मध्ये पोहोचली असे मानतात.

जपानी भाषेत गणेशाला केंगिटेन म्हणजे शक्तीशाली मानले जाते. त्यामुळे त्याची पूजाही खास प्रकारे होते. त्यात तंत्र मंत्राचा सहारा घेऊन सिद्धी मिळविण्याचा प्रयत्न असतो. जपान मध्ये सुमारे २५० गणेश मंदिरे असून त्यांची नावे वेगवेगळी आहेत. केंगीटेन शोतेन, गनबाची (गणपती), बिनायकातेन (विनायक) ही त्यापैकी काही. तंत्रपूजेमध्ये गणेशाला मादी हत्तीशी जोडलेले आहे. हत्तीण ही शक्ती आणि गणेश हा पुरुष असा त्याचा अर्थ. ही मूर्ती पुरुष स्त्री मेळाचे प्रतिक मानले जाते. ती उर्जेचे प्रतिक आहे.

ही मूर्ती पाहताना कामुक वाटते त्यामुळे ती सहज दिसेल अशी ठेवली जात नाही. सजवलेल्या लाकडी पेटीत ती ठेवली जाते आणि या पेटीची रोज पूजा केली जाते. खास प्रसंगी मात्र मूर्ती बाहेर काढली जाते. जपान मधील गणेशाचे सर्वात मोठे मंदिर माउंट ईकेमा जवळ असून त्याला होन्झोजी नावाने ओळखले जाते. ओसाका जवळ हे १७ व्या शतकातले मंदिर असून त्याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. या मंदिरात भारताप्रमाणे दान दक्षिणा दिली जाते.