स्मार्टफोन खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

आज बाजारात दररोज नवे नवे स्मार्टफोन येत आहेत परिणामी स्पर्धा खूप वाढली आहे. त्यात प्रत्येक फोन मध्ये काही तरी चांगले फिचर्स आहेत. यामुळे ग्राहक जेव्हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा स्मार्टफोन निवडताना त्याचा गोंधळ उडतो असे अनुभवास येत आहे. अश्यावेळी गोंधळून न जाता विशेष काळजी घेऊन काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर योग्य स्मार्टफोनची निवड करणे नक्कीच सोपे होते.

स्मार्टफोन खरेदीचा निर्णय घ्याल तेव्हा सर्वप्रथम तुमचे बजेट ठरवायला हवे. आज बाजारात स्वस्त, मध्यम ते अति महागडे अश्या सर्व प्रकारात फोन उपलब्ध आहेत. तुम्ही जेवढे पैसे खर्च करणार आहात त्या रेंज मध्ये सुद्धा निवडीला भरपूर वाव आहे हे लक्षात घेऊन प्रथम बजेट नक्की करायला हवे. बजेट नक्की असेल तर फोन निवड सोपी होते.

ऑपरेटिंग सिस्टीम- तुम्ही जो फोन निवडता त्याची ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम लेटेस्ट आहे ना याची खात्री करायला हवी. भारतात अँड्राईड युजर्स बाजार खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्ही नवा अँड्राईड फोन घेणार असाल तर किमान त्याला अँड्राईड ९ ओएस असेल हे पहा. ओएसचे अपडेट मिळेल का याची माहिती घ्या.

स्मार्टफोनचा महत्वाचा भाग म्हणजे त्याचा प्रोसेसर. कारण प्रोसेसरवर तुमच्या फोनची कार्यक्षमता आणि परफॉर्मन्स ठरतो. तुम्ही फोनचा अधिक वापर गेमिंग साठी करणार असाल तर स्नॅपड्रॅगन ७३० जी ते ८६४ प्रोसेसर असेल असा फोन निवडा. त्यात व्हिडीओ स्ट्रीमिंग व ऑनलाईन एडिटिंगचा चांगला अनुभव येतो.

स्मार्टफोनचा कॅमेरा हा सुद्धा विशेष निवडीचा भाग आहे. स्मार्टफोनचा अधिक वापर तुम्ही फोटोग्राफी साठी करणार असला तर चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा आहेना याची खात्री करून घ्या. त्यात खूप व्हरायटी आहेत. मेगापिक्सल पेक्षा अपर्चर, आयएसओ लेव्हल, पिक्सल साईज व ऑटोफोकस यावर अधिक भर द्या.

शेवटचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फोनची बॅटरी. स्मार्टफोन साधारण दिवसभर वापरला जातो. कॉलिंग, मेसेज यासाठी त्याचा वापर होतो तसेच आता वर्क फ्रॉम होम मुळे सुद्धा हा वापर वाढला आहे. त्यामुळे बॅटरी मोठी हवी. त्यातही फास्ट चार्जिंग सुविधा असेल तर फोन वारंवार चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. या बाबी लक्षात घेऊन स्मार्टफोन खरेदीचा निर्णय घेतला तर तुम्हाला मनासारखा फोन बजेट मध्ये मिळू शकेल.