वैदिक वाङ्मयाचा अभ्यासक्रम

ved

यूरोप खंडातील काही देशांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने डॉक्टरेटसाठी प्रयत्न करत असतात. मात्र डॉक्टरेट पदवी मिळविण्यासाठी संशोधन करून प्रबंध सादर करावा लागतो आणि प्रबंधाचा विषय निवडणे ही एक मोठी डोकेदुखी असते. कारण हजारो विद्यार्थी डॉक्टरेट करतात आणि एका विद्यार्थ्याने प्रबंधासाठी निवडलेला विषय दुसर्‍या विद्यार्थ्याला हाती घेता येत नाही. त्यामुळे नवा आणि कोणीही न हाती घेतलेला विषय निवडण्यासाठी फार भटकंती करावी लागते. परंतु अलीकडेच या विद्यार्थ्यांना असे आढळले आहे की, भारतामध्ये असे विपुल विषय उपलब्ध आहेत. विशेषतः वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत शिवाय आध्या-त्मिक विद्या, योग असे अनेक विषय भारता-मध्ये मिळू शकतात.

या विषयांचे वैशिष्ट्य असे आहे की, विज्ञान, समाजशास्त्र, भाषा, आरोग्य विज्ञान अशा किती तरी विषयांच्या अनुषंगाने या विषयांवर संशोधन करता येते. म्हणूनच रशियामध्ये कोणी तरी ज्ञानेश्वरीवर प्रबंध लिहिलेला आढळतो तर फ्रान्समधली एखादी विद्यार्थिनी महाभारतावर पी.एचडी. करते. जर्मनीमध्ये एका विद्यार्थ्यांने समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर पी.एचडी. मिळवलेली आहे तर एका विद्यार्थिनीने संत तुकाराम महाराजांच्या अभंगांवर संशोधन केलेले आहे. तिकडे अशा सर्व भारतीय ज्ञान शाखांना मिळून इंडॉलाॅजी असे नामाभिधान प्राप्त झालेले आहे. अमेरिकेत तर अग्निहोत्राचा अभ्यास करणारे एक विद्यापीठच आहे. आपले दुर्दैव असे की, भारतीयांच्या या पुरातन ज्ञानाची भारतातच उपेक्षा केली जाते आणि भारतातले काही आंग्लाळलेले विद्वान भारतीय शास्त्रांना कालबाह्य म्हणून हिणवतात. म्हणूनच भारतातल्या काही संस्थांनी आपली ही जुनी विरासत जतन करण्याच्या भावनेतून वैदिक वाङ्मयाच्या अभ्यासक्रमांचे आयोजन केले आहे.

कर्नाटकातील मंगळूर जवळच्या नानतूर या गावच्या श्री भारती कॉलेज या महाविद्यालयाने वैदिक वाङ्मयाचा पदविका अभ्यास-क्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एन. भट यांनी या अभ्यासक्रमाची माहिती दिली. तो सहा महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम असून तो ४०० मार्कांचा आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नाही. कारण भारतातल्या विद्यापीठ अनुदान आयोगाने अशा प्रकारच्या अभ्यासक्रमांना मान्यता दिलेली नाही. ज्यांना भारतीय तत्वज्ञानाविषयी आपुलकी असेल त्यांनी हौस म्हणून हा अभ्यासक्रम करायला हरकत नाही. एकंदर १३० तासांचा अभ्यासक्रम असेल आणि या अभ्यासक्रमाची पहिली बॅच ३१ जानेवारी २०१३ रोजी बाहेर पडेल. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाईल आणि त्याचे तास दर शनिवारी २ ते ५ या वेळेत तसेच रविवारी ९।। ते ४।। या वेळेत घेतले जातील. शिक्षणाचे माध्यम कन्नड असेल.

Leave a Comment