पादत्राणांचे (शूज) डिझायनिंग

ऐकताच विचित्र वाटेल, पण पादत्राणांचे डिझायनिंग करणे हे सुद्धा एक करिअर आहे. कारण पादत्राणांचे उत्पादन, विक्री यामध्ये अलीकडच्या काही वर्षात मोठा बदल झालेला आहे. पादत्राणे तयार करणे हे चर्मकार जमातीचे काम आहे, ही कल्पना आता मागे पडली आहे. कारण चर्मकार मंडळी फक्त कातड्याची पादत्राणे तयार करतात आणि आता पादत्राणांसाठी कॅनव्हास, विविध प्रकारचे धागे त्याचबरोबर पेट्रोलजन्य पदार्थांपासून तयार झालेले कृत्रिम कातडे यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. पादत्राणांचे डिझायनिंग करणे हे सरधोपट काम राहिलेले नाही. त्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. पायाचा आकार आणि पायातले सर्व प्रकारचे चढ-उतार यांचा बारकाईने विचार करून आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आता पादत्राणे तयार केली जायला लागली आहेत. मोठ्या मॉलमध्ये गेल्यानंतर २५-३० हजार रुपये ही बुटांची किंमत असू शकते हे आपल्या लक्षात येते आणि आपल्याला आश्‍चर्य वाटते.

परंतु असा एखादा किमती बूट किंवा चप्पल वापरून पाहिल्यानंतर पायांना जो आराम मिळतो तो अनुभवून आपल्याला त्याची ती भारी किंमत योग्यच आहे याचा साक्षात्कार होतो. कारण त्या बुटाचे डिझायनिंग करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. म्हणून आता पादत्राणांच्या डिझायनिंगचे अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये डिझायनिंगबरोबरच त्यांचे विविध प्रकारचे रंग, त्यांना लावले जाणारे अस्तर आणि त्याचा बाह्य आकार याबाबतही शिक्षण दिले जाते. भारत हा पादत्राणे तयार करणारा जगातला चीननंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे भारतात या व्यवसायाला आणि त्यातून होणार्‍या निर्यातीला मोठी संधी आहे.

बारावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना फुटवेअर डिझाईन मॅनेजमेंट ऍन्ड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येतो. या विषयातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय काही संस्थांमध्ये करण्यात आलेली आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना नाईक, आदिदास, रिबोक अशा पादत्राणे तयार करणार्‍या कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळू शकतात. हे अभ्यासक्रम पुरवणार्‍या काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत. फुटवेअर डिझाईन ऍन्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही या क्षेत्रातली अग्रगण्य संस्था आहे. तिच्या शाखा नोयडा, चेन्नई, बंगळूर, मुंबई आणि कोलकत्ता येथे आहे. या संस्थेची वेबसाईट www.fddi india.com / index.html अशी आहे.

त्याशिवाय सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट चेन्नई या संस्थेतही हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आग्रा येथे या क्षेत्रात बरेच काम होत असते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने तेथे गव्हर्नमेंट लेदर इन्स्टिट्यूट ही संस्था स्थापन केलेली आहे. तिची वेबसाईट www.gliagra.com अशी आहे.

Leave a Comment