पर्यावरण शास्त्राचा अभ्यास

evs

सध्या पर्यावरण शास्त्राचे महत्व किती वाढले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. किंबहुना शिक्षण क्षेत्रात पर्यावरण, पर्यावरणाचे शास्त्र हे सर्वाधिक महत्वाचे ठरलेले आहे. अलीकडच्या काळात समाजामध्ये या विषयात खूप जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना नोकरीच्या संधी तर उपलब्ध होण्याची शक्यता आहेच, पण एरवीही एक ज्ञान शाखा म्हणून तिचे महत्व आहेच. म्हणून बरेच विद्यार्थी पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाकडे वळत आहेत. भारतामध्ये बर्‍याच विद्यापीठांनी आता पर्यावरणाचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेतच. पण आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेले काही अभ्यासक्रम भारतात आहेत. त्यांचा परिचय करून घेतला पाहिजे.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) www.jnu.ac.in स्कूल ऑफ एन्व्हायरन्मेंटल सायन्सेस (एसईएस) असा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आलेला आहे. पर्यावरणाविषयी आता जागृती निर्माण होत असली तरी या विद्यापीठाने १९७४ पासून या विषयाची दखल घेतलेली आहे. या विभागातर्फे पर्यावरण शास्त्रावरील एम.एस्सी. पदवी दिली जाते. शिवाय एम.फिल आणि पीएच.डी. करण्याची सोय आहे. दिल्लीतल्याच सेंटर फॉर इकॉलाॅजीकल स्टडीज् (सीईएस) या संस्थेनेही १९८२ सालपासून हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. ही संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस या ख्यातनाम संस्थेचा एक भाग आहे. या संस्थेचा हा अभ्यासक्रम जगभरात प्रसिद्ध आहे आणि विविध देशातले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी दिल्लीला येत असतात. या अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती तिच्या वेबसाईटवर मिळेल.

दक्षिणेतील पाँडेचेरी विद्यापीठात सुद्धा सीईएस अशी संस्था स्थापन करण्यात आली आहे आणि त्याही संस्थेमध्ये पदव्युत्तर पदवी किवा डॉक्टरेट करण्याची सोय आहे. तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील बिशप हेबर्स कॉलेज मध्ये पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाची विशेष सोय आहे. या महाविद्यालयाला तामिळनाडू सरकारने अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे मिळालेल्या स्वायत्ततेतून या महाविद्यालयाने जागतिक दर्जाचा अभ्यासक्रम विकसित केला आहे. पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम हा भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि पर्यावरणातील जीवशास्त्रीय घटक यातून निर्माण झालेला आहे. त्याशिवाय या अभ्यासक्रमामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाच्या नासाडीचा मानवी जीवितावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला जातो. स्थानिक पातळीवरील जैव विविधता आणि त्यांचे उपयोग यावरही या शास्त्रात संशोधन केले जाते. या शास्त्राचे एक वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र अशा केवळ विज्ञानाशी संबंधित शास्त्रांचाच अभ्यास करावा लागतो असे नाही तर कायदा, इतिहास, अर्थशास्त्र अशा सामाजिक शास्त्रांचाही अभ्यास करावा लागतो.

पर्यावरण ही एक प्रक्रिया आहे आणि पर्यावरणाचे स्वरूप वरचेवर बदलत चाललेले आहे. या बदलाचा वेध घेण्यासाठी अनेक शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम अनेकपदरी आणि गुंतागुंतीचा झालेला आहे. दहावी किवा बारावी नंतर पर्यावरण शास्त्राच्या पदवी अभ्यास-क्रमाला प्रवेश घेता येतो आणि त्यामुळे पदवी प्राप्त करता येते. परंतु या पदवी अभ्यासक्रमा मध्ये या शास्त्राची फार वरवरची माहिती मिळते. त्या पलीकडे जाऊन काही सखोल ज्ञान मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त केल्यानंतर वर उल्लेख केलेल्या मान्यता प्राप्त संस्थांमध्ये जाऊन पदव्युत्तर पदवी घ्यावी लागेल.

सध्या आपले सरकार पर्यावरण रक्षणावर मोठा भर देत आहे आणि त्यामुळेच अभ्यास क्रमांना सुद्धा सरकारी मदत मिळत असते. विविध स्वयंसेवी संघटना सरकारच्या मदतीने आणि वेळ पडल्यास परदेशात आलेल्या निधीच्या आधारे सुद्धा पर्यावरणाविषयीचा अभ्यास करणारे अनेक प्रकल्प राबवत असतात. अशा प्रकल्पांमध्ये या पदवीधरांना सहभागी होता येईल.

Leave a Comment