कृषि तंत्रज्ञान सल्लागार

एका दैनिकाने दोन वर्षांपूर्वी उपवर मुलींच्या मुलाखती घेतल्या होत्या. सर्व मुलींनी एकमुखाने शेतकरी नवरा नको असे निक्षुन सांगितले. मात्र आता बदल झाला आहे. सांगलीत गेल्या आठवड्यात झालेल्या एका वधुवर परिचय मेळाव्यात अनेक मुलींनी शेतकरी नवरा चालेल असे म्हटले आहे. या मागची नेमकी भूमिका काय आहे हे माहीत नाही पण गेल्या दोन तीन वर्षात भाजीपाला आणि फळांना चांगला भाव येत असल्याने शेती हेही एक करीयर आहे असे  लोकांना वाटायला लागले आहे. आज ना उद्या शेतीतले तंत्रज्ञान सुधारेल आणि शेती व्यवसाय करणारेही सुखी संपन्न होतील.

शेती काही वेळा अडचणीची वाटत असेल पण जोपर्यंत माणसाला खायला लागते तोपर्यंत या धंद्यात कधी मंदी येणार नाही ही या व्यवसायातली एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. शेती  ही पावसाच्या लहरीवर अवलंबून असली तरीही शेतीतले जोडधंदे तसे नसतात. म्हणून शेतीला जोड धंद्याची जोड दिली तर शेतीतली अनिश्चितता आणि निसर्गावरचे अवलंबन संपून जाईल. ज्याची स्वतःची शेती असेल त्यांनी तर शेतीचा करीयर म्हणून विचार करावाच पण ज्यांची स्वतःची शेती नसेल त्यांनी  शेतीपूरक धंद्याचा विचार करायला काही हरकत नाही. शेती करणारांना सल्ला देण्यासाठी कन्सल्टन्सीचा व्यवसाय करता येईल. त्यासाठी कृषि विद्यापीठांच्या अंतर्गत येणार्‍या महाविद्यालयातली कृषि पदवी घेतली तरी चालतेच पण आता अनेक महाविद्यालयांत बारावी नंतरचे दोन वर्षांचे पदविका अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. हे अभ्यासक्रम पुरा करणारे पदविकाधारक शेतकर्‍यांना शेती सल्ला देण्याचा व्यवसाय करू शकतील.

भारतातील लाखो शेतकरी केवळ घरात परंपरेने शेती व्यवसाय चालू आहे म्हणून आणि दुसरे काही येत नाही  म्हणून शेती करीत असतात. देशातली बरीचशी शेती अशी तांत्रिक माहितीच्या अभावातच केली जात असते. अशा शेतकर्‍यांना शेतीचा योग्य सल्ला दिला आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली तर ते शेतकरी सल्ल्याची फी म्हणून चांगली रक्कम देतात. अनेक धनिक लोक शेतीपासून दूर राहून शेती करतात. पण त्यांना शेतातल्या गड्यांच्या अज्ञानावर आधारलेली शेती नको असते. त्यांच्या शेतात असे सल्लागार चांगले उत्पन्न काढू शकतात आणि त्या बदल्यात चांगली फीही देतात. तेव्हा शेती असलेल्या आणि नसलेल्याही शेती पदवी पदविकाधरांनी या व्यवसायाचा जरूर विचार करावा.

Leave a Comment