कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट

बी.ई. सिव्हील हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना आता एक नवीन क्षेत्र खुले झालेले आहे. खरे म्हणजे हे क्षेत्र आधीच निर्माण झालेले आहे, परंतु ते अर्धवट ज्ञान असलेले मुनीम किंवा कारभारी लोकांचे क्षेत्र होऊन बसले होते. अभियांत्रिकी शाखेचा कसलाही अभ्यास नसताना काही लोक केवळ अनुभवाच्या जोरावर या क्षेत्रात म्हणजे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटच्या क्षेत्रात काम करत होते. विटा, सिमेंट, वाळू, लोखंड यांची सतत व्यवहार करून मिळालेली वरवरची माहिती आणि एकंदरीत कोणत्याही गोष्टीचे व्यवस्थापन करण्याचा अनुभव याच्या जोरावर कित्येक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित लोक बांधकामावर नजर ठेवण्याचे किंवा बांधकामाची निगराणी करण्याचे काम करत होते. अर्थात, या कामाला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असे म्हणावे ही कल्पना सुद्धा पुढे आलेली नव्हती.

ती कच्च्या स्वरुपात राबवली मात्र जात होती. तसा विचार केला तर एखादी इमारत बांधणे हे अनेकांचे काम असते. आर्किटेक्टपासून घराला रंग देणार्‍या व्यक्तींपर्यंत अनेक लोकांनी ती इमारत उभी केलेली असते, सजवलेली असते. या सर्व कामांचा समन्वय साधणे गरजेचे असते. तसे न झाल्यास अनेक घोटाळे निर्माण होतात. कामाचे टाईमटेबल विस्कळीत होते किंवा योग्य वेळी मटेरियल खरेदी न केल्याने इमारतीची किंमत वाढलेली असते, अथवा थोड्या श्रमात होणारे काम करण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतात. म्हणून कमीत कमी श्रमात, कमीत कमी पैशात उत्तम इमारत कशी बांधली जाईल हे बघण्यासाठी असा एक माणूस असायला पाहिजे जो इमारत बांधकामातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवील.

त्यालाच आताच्या आधुनिक युगामध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असे म्हटले गेलेले आहे. अशी मॅनेजमेंट करणारी व्यक्ती जर प्रशिक्षित इंजिनिअर असेल तर इमारत बांधकामा तल्या प्रत्येक टप्प्याची पूर्णपणे निर्दोष, तांत्रिक माहिती त्याच्याकडे असेल आणि तो उत्तम व्यवस्थापन करू शकेल. त्याच्या कामामध्ये इस्टिमेशन, शेड्युलिंग, प्रॉजेक्ट कंट्रोल या विषयांचा समावेश होतो. या प्रत्येक विषयाचे तपशील माहित करून घेऊन त्या त्या विषयाचे तांत्रिकज्ञान या अभ्यासक्रमात शिकवले जात असतात. त्यामध्ये वस्तूंच्या किंमती-पासून ते बांधकामाशी संबंधित कायदे इथपर्यंत सर्व विषय आलेले असतात. या क्षेत्रामध्ये आता बांधकामाशी संबंधित असलेल्या सर्व पायाभूत गोष्टींचा अभ्याससुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. शिवाय इन्टरनॅशनल प्रॉजेक्ट मॅनेजमेंट असा एक नवा विषय आलेला आहे.

या संबंधीचे अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहेत. चेन्नईच्या आयआयटीमध्ये एक अभ्यासक्रम आहे. शिवाय दिल्लीच्या आयआयटीमध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचा पदव्युत्तर अभ्याक्रम आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातर्फे पत्रद्वाराही या विषयतली पदवी मिळवता येते.

Leave a Comment