आयुर्वेदिक ब्युटी थेरपी

सध्या ब्युटी पार्लरचा व्यवसाय फार तेजीत चाललेला आहे. अनेक महिला लहान-मोठे ब्युटी पार्लरचे अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या घरात किंवा एखाद्या छोट्या जागेमध्ये अल्पशा भांडवलाच्या जोरावर स्वत:चे ब्युटी पार्लर सुरू करत आहेत. त्यात त्यांची स्वत:ची हौसही भागते आणि घर संसाराला थोडासा हातभारही लागतो. काही महिला तर जागेची व्यवस्था न झाल्यास आपले ब्युटी पार्लरचे कीट तयार करून ते घेऊन घरपोच ब्युटी पार्लरची सेवा द्यायला लागलेल्या आहेत. असे असले तरी या ब्युटी पार्लरमध्ये वापरली जाणारी सौंदर्य प्रसाधने कृत्रिम आणि रसायनांपासून तयार केलेली असतात. एकदा ती वापरली की, बरी वाटतात. चेहर्‍यावर फेशल चढवले की चेहरा फ्रेशही दिसतो.

मात्र या रासायनिक प्रसाधनांचा वापर दीर्घकाळ केला, तर त्यांचे काही दुष्परिणाम चेहर्‍यावर दिसायला लागतात. काही लोक केसाला कलप लावतात. केस काळे किंवा लाल होतात. परंतु त्यांचा सातत्याने वापर केला की, वारंवार वापर करावाच लागतो आणि काही काही लोकांमध्ये त्यातून काही व्याधी निर्माण होतात. म्हणूनच सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणार्‍या काही सुशिक्षित जागरूक लोकांमध्ये आयुर्वेदावर आधारलेली आणि वनस्पतीपासून तयार केलेली सौंदर्य प्रसाधने वापरण्याविषयी उत्सुकता निर्माण व्हायला लागली आहे. आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनांचा कसलाही कायम स्वरूपी विपरित परिणाम होत नाही. हा त्यांचा फायदा आहे. याचा वापर करून माधवबाग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च (एमआयएमईआर) या संस्थेने आयुर्वेदिक ब्युटी थेरपीज् आणि आयुर्वेदिक स्पा यांचे छोटे छोटे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत.

या संस्थेची आयुर्वेदाच्या प्रसारासाठी खूप धडपड चाललेली आहे आणि सार्‍या महाराष्ट्रालाही माहीत आहे. त्यांनी आजवर पंचकर्मासारखे आयुर्वेदिक उपचार लोकप्रिय केलेले आहेत. त्यांनी आता ब्युटी थेरपीमध्ये लक्ष घातलेले आहे. एप्रिल महिन्यामध्ये ठाणे येथे या संस्थेचे ब्युटी थेरपी आणि आयुर्वेदिक स्पा यांचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमात आयुर्वेदिक ब्युटी ट्रिटमेंटसचे प्रशिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाते आणि त्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या यंत्रांचा वापर कसा करावा, यावरही मार्गदर्शन केले जाते. एखादा छोटा अभ्यासक्रम पूर्ण करून एखाद्या गृहिणीला आपले स्वत:चे आयुर्वेदिक ब्युटी पार्लर नक्कीच सुरू करता येईल. त्यांना महिलांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळेल. कारण अजूनही घराघरांमध्ये हळद, चंदन, डाळीचे पीठ, लिंबू, साय अशा पारंपरिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर होत असतो. मात्र त्याला शास्त्रीय आधार देऊन कोणी उपचार केले तर लोकांना हवेच असतात.

 

Leave a Comment