आणखी १५ वर्षात पृथ्वीच्या पोटातील सोने संपणार

फोटो साभार बिझिनेस इनसायडर

गेले काही महिने सोन्याचे वाढत चाललेले दर हा जगभर चर्चेचा विषय बनला आहे. सोने संबंधित जागतिक कंपनी गोल्डमन सॅचने अश्या परिस्थितीत जाहीर केलेला अहवाल विशेष औत्सुक्याचा बनला आहे. त्याच्या अहवालानुसार आणखी १५ वर्षात म्हणजे २०३५ सालापर्यंत पृथ्वीच्या पोटातील म्हणजे सोने खाणी मधील सर्व सोने बाहेर काढून संपलेले असेल आणि त्यामुळे जमिनीखाली सोने राहणार नाही.

बीबीसी रिपोर्ट नुसार वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे प्रवक्ते हम्माह ब्रांडसटीटर म्हणाले गेली काही वर्षे खाणीतून सोने निघण्याचे प्रमाण कमी होत चालले होते. गतवर्षी जगभरातील सोने खाणीतून ३५३१ टन सोने बाहेर काढले गेले. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने काही दिवसापूर्वी जाहीर केलेल्या अहवालात पृथ्वीच्या पोटात आता अंदाजे ५४ हजार टन सोने शिल्लक असावे. पृथ्वीच्या पोटात जेवढे सोने होते त्याचा हा ३० टक्के भाग आहे. म्हणजे ७० टक्के सोने बाहेर काढले गेले आहे.

विशेष म्हणजे खाणीतून काढल्या गेलेल्या या ७० टक्के सोन्यापैकी ५० टक्के सोने दागिने घडविण्यासाठी वापरले गेले असून ते खासगी मालकीचे बनले आहे. त्यामुळे कुणाकडे किती सोने आहे हे सांगणे अवघड आहे. काही देश त्यांच्याकडचे सोने साठे जाहीर करत नाहीत. आता पृथ्वीच्या पोटात शिल्लक असलेले ५४ हजार टन सोने फक्त दोन कार्गो मध्ये मावेल असेही सांगितले जात आहे.