केंद्रीय मंत्र्याचे राहुल आणि प्रियंका गांधी यांना आव्हान, …तर राजकारण सोडून देईन


भोपाळ – केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी कृषि विधेयकाविरोधात आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर एखाद्या पिकाच्या पानावरुन ते पीक कोणते आहे हे या दोघांनी ओळखल्यास मी राजकारण सोडून देईन, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

शेतकऱ्यांची गांधी परिवाराकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. शेळ्यामेंढ्यामधला फरक राहुल आणि प्रियंका गांधी यांना कळणार नाही. तसेच जर शेतातील पीकाच्या पानांवरुन ते कशाच पीक आहे हे या बहिणभावाने ओळखल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे शेखावत यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे पंजाब, हरयाणामध्ये शेतकरी कायद्यांविरोधात राहुल गांधी यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, एकवेळ मिरचीचे रोप असते हे राहुल गांधी यांना ठाऊक असेल पण कांदा जमिनीखाली उगवतो की जमीनीच्यावर हे त्यांना माहिती नसेल.