कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट


मुंबई – रविवारी आरेतील मेट्रो कारशेडच्या वादावर पडदा पडला. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजुरमार्ग होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मेट्रो कारशेडबद्दल राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांकडून आता टीका होताना दिसत आहे. मेट्रो कारशेडच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य नसल्याचे स्पष्ट करत कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर आरे येथील मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे आदेशही मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला दिल्याची घोषणा केली.


निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर ट्विट करत निर्णयावरून ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही, कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे.