टीआरपी घोटाळ्यातील वृत्तवाहिन्यांना जाहिरात न देण्याचा पार्लेचा निर्णय


मुंबई : मागील आठवड्यातच टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता जाहिरातदार देखील त्यासंदर्भात मोठा निर्णय घेत आहेत. या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय बजाज ऑटोने घेतल्यानंतर आता पाठोपाठ बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले कंपनीनेही आपल्या जाहिराती काही वृत्तवाहिन्यांवर न दाखवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. टीआरपी घोटाळा पोलिसांनी उघड केल्यानंतर यावर आम्ही लक्ष ठेवून असल्याचे प्रमुख जाहिरातदार आणि मीडिया एजन्सीने म्हटले आहे.

आम्ही द्वेष पसरवणाऱ्या वृत्तवाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी दिली. याबाबत ते म्हणाले की, अशी शक्यता आम्ही पडताळत आहोत, ज्यात इतर जाहिरातदार एकत्र येतील आणि वृत्तवाहिन्यांवर जाहिराती देण्याच्या आपल्या खर्चाला आळा घालतील, जेणेकरुन वृत्तवाहिन्यांना स्पष्ट संकेत जाईल की, आपल्या मजकुरात बदल करणे त्यांना गरजेचे आहे. आम्हाला आक्रमकता आणि द्वेष वाढवण्यास प्रोत्साहन देणाऱ्या वाहिन्यांवर खर्च करायचा नाही, कारण ते आमचे ग्राहक नाहीत.

सोशल मीडियावर पार्लेच्या या निर्णयाचे खूप कौतुक होत असून देशासाठी हे चांगले काम असल्याचे एका ट्विटर युझरने म्हटले आहे. तर उत्तम निर्णय अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने दिली. फारच उत्तम, सन्मान, जास्तीत जास्त कंपन्यांनी या मार्गावर चालायला हवे, असे ट्विट एकाने केले आहे. तर ही फक्त सुरुवात असू शकते, अपेक्षा आहे की अधिकाधिक कंपन्या याचे पालन करतील आणि आपल्याला एक सकारात्मक बदल पाहायला मिळेल, असे ट्विट आणखी एका ट्विटर युझरने केले आहे.