एका जातीसाठी सरकारने रद्द केल्या एमपीएससीच्या परीक्षा – प्रकाश आंबेडकर


पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. यावरुन आता प्रकाश आंबेडकरांनी टीका करताना, एमपीएससीच्या परीक्षांवर तोडगा काढता आला असता. पण राज्य सरकारने ही परीक्षा रद्द करताना एकाच जातीचा विचार केला आहे. पण उर्वरित 85 टक्के जनतेचे काय?’ असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

मला जे बोलायचे ते मी बोलतो. मी एका जातीचे राजकारण चालणार नाही. आम्ही कोणत्या प्रश्नांवर बोलायचे हे ठरवितो. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आपले चारित्र बघावे आणि नंतर टीका करावी, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला. सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांना विश्वास दिला नाही. महाविकास आघाडीचे सरकार अतिरेक करत आहे. केंद्र सरकारच्या दिशानिर्देशची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार करत नसल्याची टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

सरकारच्या विरोधात वारकरी संप्रदायाने आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. वारकऱ्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत सरकार दिसत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. सरकार निष्फळ ठरले आहे. आम्ही या विरोधात आंदोलन करत असून त्याचबरोबर केंद्र सरकारच्या शेतकरी कृषी विधेयकाने शेतकऱ्याला काहीही फायदा मिळणार नसल्याची टीकाही त्यांनी केली.