जिभेची तलवारबाजी जनता फार काळ सहन करेल अशी स्थिती नाही – सामना


मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर या मुद्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळाले. त्यावरुन राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने सुरु झाली. या प्रकरणात राजकीय वर्तुळात वजन प्राप्त असणाऱ्या मंडळींनी उडी घेतली आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आळवण्यात येणारा सूर अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले.

आरक्षणाचा मुद्दा राज्यात जोर धरत असतानाच काही नेतेमंडळींनी वापरलेली भाषा पाहता, शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखात हीच बाब अधोरेखित करत जिभेची तलवारबाजी जनता फार काळ सहन करेल अशी स्थिती नसल्याची बाब मांडत टोला लगावला.

सध्या राज्यात जातीय आरक्षणासाठी तलवारी उपसण्याची भाषा सुरु आहे. अशी भाषा करणारी मंडळी तालेवार असल्याचे म्हणत आता शमीच्या झाडावर असणारी शस्त्र नेमकी कोण काढणार आणि ती कोणावर चालवली जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष असेल, असे म्हणत आरक्षणासाठी चर्चेत असणाऱ्या दोन्ही राजांवर अग्रलेखातून निशाणा साधला गेला आहे.

राज्यातील एकंदर परिस्थिती, जनतेवर असणारा आर्थिक बोजा पाहता आता जनता जिभेची तलवारबाजी सहन करणार नाही, शिवसेनेकडून हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. राज्याचे प्रश्न वेगळे असल्याचे म्हणत अग्रलेखातून कोरोना काळात उदभवलेले आर्थिक संकट आणि त्यामुळे सर्वसामान्यांवर ओढावलेल्या हलाखीच्या परिस्थितीची काही उदाहरणे देत या प्रश्नांवर बोलण्यास कोणीही तयार नसल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली.

उदयनराजे आणि संभाजी राजे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यातच एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या नाहीत तर, वेळ आल्यास तलवारी काढू असे इशारावजा वक्तव्येही यादरम्यान करण्यात आले होते. त्यावरुनच सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.