मुंबईची बत्तीगुल; कंगना पुन्हा पॉवरफुल, शेअर केला राऊतांचा ‘तो’ फोटो


मुंबई – मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा ग्रीड फेल झाल्याने खंडित झाला असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक लोकलदेखील थांबल्या होत्या. अभिनेत्री कंगना राणावतपासून ते दिग्दर्शक अशोक पंडित यांच्यासह अनेकांनी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

मुंबईतील समस्यांवरुन सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी अभिनेत्री कंगना राणावत सोडत नाही. कंगनाने आरेमधील मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याच्या निर्णयावर रविवारी टीका केली होती. त्यानंतर, आज सकाळी मुंबईत झालेल्या अंधारावरुनही कंगनाने बीएमसी आणि राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. कंगनासोबतच दिग्दर्शक अशोक पंडित, कुणाल खेमू यांनी देखील सरकारला चिमटा काढला आहे. तर, नेटकऱ्यांनी देखील ट्विटरवरुन सरकारला लक्ष्य केले आहे.


खासदार संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचा फोटो शेअर कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे. मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार क..क..क…. कंगना करण्यात व्यस्त असल्याचे ट्विट कंगनाने केले आहे.

तर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पॉवरलेस झाल्याची टीका दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही केली आहे. ते आता रिपब्लिक आणि अर्नब गोस्वामीला यासाठी दोष देणार नाही अशी अपेक्षा. मुंबईच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे कधीच वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. हे ग्रीड फेल्युअर म्हणजे सरकार प्रशासनामध्ये अपयशी ठरत असल्याचे हे उदाहरण असल्याचे पंडित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.