प्रभासच्या ‘आदिपुरूष’ मध्ये अजय देवगण साकारु शकतो ‘ही’ भूमिका


आपल्या पदार्पणातच ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे चर्चेत आलेला मराठमोठा दिग्दर्शक ओम राऊत सध्या आपल्या आगामी ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. सतत काहीना काही अपडेट्स या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाबाबत मिळत आहे. प्रभास नंतर या चित्रपटात सैफ अली खान झळकणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशात आता अभिनेता अजय देवगणचे नावही या चित्रपटासोबत जोडले जात आहे.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘आदिपुरूष’च्या निर्मात्यांनी या चित्रपटात सैफ अली खान लंकेशची म्हणजेच रावणाची भूमिका साकारणार अशी घोषणा आधीच केली आहे. तर रामाची भूमिका प्रभास साकारणार आहे. त्यातच या चित्रपटात आता अभिनेता अजय देवगण भगवान शंकराची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘आदिपुरूष’मध्ये प्रभास भगवान रामाची भूमिका साकारणार असल्याची घोषणा ओम राऊत याने आधीच केली होती. भलेही प्रभास मुख्य भूमिकेत असेल, पण सर्वांचे लक्ष सैफ अली खान आणि अजय देवगन या जोडीवर असणार आहे. कारण या दोघांची जोडी तान्हाजी चित्रपटात प्रेक्षकांना खूप पसंत आली होती. दोघांच्याही भूमिकांचे भरभरून कौतुक करण्यात आले होते.

‘आदिपुरूष’चे प्री-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू असून २०२१ मध्ये चित्रपटाचे शूटींग सुरू होईल आणि हा चित्रपट २०२२ मध्ये रिलीज करण्याचा विचार सुरू आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी, तेलुगूसहीत इतरही वेगवेगळ्या भाषांमध्ये डब केला जाणार आहे. तर तमिळ, मल्याळम आणि कन्नडासहीत इतर आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये डब केला जाणार आहे.