वुहान जवळ बांधले गेले होते गुप्त बोगदे

फोटो साभार डेली एक्सप्रेस

करोनामुळे जगभर चर्चेत आलेल्या चीनच्या वुहान शहराजवळ अणुयुद्ध परिस्थिती उद्भवली तर सेना मुख्यालय म्हणून वापर करता यावा यासाठी बांधले गेलेले गुप्त बोगदे आता चीनी पर्यटकांना खुले करण्यात आले आहेत. शीत युद्ध काळात चीन आणि सोविएत युनियन यांच्यात अण्वस्त्र युद्ध भडकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा चीनचा कम्युनिस्ट नेता माओ त्से तुंग याने देशाचे नागरिक आणि लष्कर याना सुरक्षित राहता यावे यासाठी भूमिगत शहरे उभारण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बीजिंग येथे असे भूमिगत शहर उभारले गेले होते. पण वुहान जवळ उभारण्यात येत असलेल्या या भूमिगत शहराची माहिती बाहेर आलेली नव्हती. या प्रकल्पाला प्रोजेक्ट १३१ असे नाव दिले गेले होते.

वुहान पासून ५० मैल अंतरावर हे काम पहाडाच्या खाली सुरु झाले होते. हुबेई प्रांतात ३१ जानेवारी १९६९ मध्ये असे काम सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्या अंतर्गत ४५६ मीटरपर्यंत काम झाले पण ते पूर्ण झाले नाही. यात पीपल्स लिबरल आर्मी साठी मिटींग रुम्स, वरिष्ठ कमांडर्ससाठी ऑफीस, माओ आणि त्याचा सहकारी बाओ यांच्यासाठी हवेल्या यांचा समावेश होता. पण बाओने आपल्याविरुद्ध कट केला असा संशय माओला होता त्यावेळी हे काम थांबविले गेले. त्यानंतर बाओचा विमान अपघातात मृत्यू झाला. आता हे बोगदे फक्त चीनी पर्यटकांसाठी खुले केले गेले असून त्यातील काही भागात आजही प्रवेश दिला जात नाही. आजही हा भाग लष्करी प्रकल्प मानला जातो.