हा ठरला करोना काळातील सर्वात महाग वाढदिवस

फोटो साभार आशियाव्हिले

करोनामुळे संपूर्ण जग थांबल्यासारखे झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर नोकरदार माणसांनी सुद्धा खर्च कमी केले आहेत. यात काही लोकांनी मात्र खर्चाचा धुमधडाका लावलेला दिसून येत आहे. स्पेन मध्ये राहणाऱ्या एका लेबनीज महिलेने तिचा ४० वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला असून त्यानिमित्त चक्क २१४ कोटी खर्च केले आहेत. घरी केलेल्या वाढदिवसाला तिने १० निमंत्रित बोलावले होते पण एकूण कार्यक्रमावर २१४ कोटी खर्च झाला आहे.

तिने वाढदिवसानिमित्त देश विदेशातील २० शहरातील मित्र, नातेवाईक, परिचित यांच्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे पार्टी दिली. त्यात १५० लोक सामील झाले होते. त्यात बेरुट- दुबई मध्ये ३-३, लंडन, लॉस एंजेलिस, हॉंगकॉंग, कुवेत, कतार, पॅरीस मध्ये २-२ तर टोक्यो, मास्को मध्ये प्रत्येकी १ व्हर्च्युअल पार्टी केली गेली.

संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी या महिलेने २.५ कोटी किमतीचे फेसशिल्ड वापरले होते. वाढदिवसाचा गाऊन हिरे मोत्याने जडविला होता. तो तयार करण्याचे काम ब्रिटनच्या जानेमाने डिझायनर देबी विघम व डिजिटल आर्टिस्ट गॅरी मॅक्वीन यांच्याकडे सोपविले गेले होते. त्यांनी या गाऊनवर १८३ कोटी रुपयांचे दुर्मिळ लाल हिरे लावले होते.

मिजाज शहरातील हवेलीत साजऱ्या झालेल्या या वाढदिवसाला जे पाहुणे प्रत्यक्ष उपस्थित होते त्यांना विशेष मास्क भेट म्हणून देण्यात आले. त्या मास्कवर हिऱ्याची ब्रेसलेट लावली गेली होती आणि त्याची किंमत होती ६५ लाख.