साक्षी, जीवाला धमकी देणाऱ्या युवकाला अटक

फोटो साभार नॅॅशनल हेराल्ड

आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई सुपरकिंगचा कप्तान धोनी सामना हरल्यावर ८ ऑक्टोबर् रोजी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा यांच्याबाबत सोशल मिडियावरून अश्लील वक्तव्ये आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुजराथच्या कच्छ मधून मुंद्रा येथून अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती म्हणजे बारावी मध्ये शिकत असलेला १६ वर्षाचा मुलगा असल्याचे गुजराथ पोलिसांनी सांगितले. या मुलाला झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार या मुलाने सोशल मिडियावरून साक्षी धोनीला शिवीगाळ आणि जीवाला धमकी दिली होती. झारखंड पोलिसांच्या टेक्निकल टीमने तपास सुरु केला तेव्हा गुजराथ मधील आयपी अॅड्रेसवरून हा मजकूर लोड केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून धमकी देणाऱ्याचा पूर्ण पत्ता मिळाला. दरम्यान रांची पोलिसांनी धोनी याच्या फार्महाउस वर जाऊन त्याच्या कुटुंबियांच्या संमतीने तक्रार दाखल करून घेतली. धमकी देणाऱ्या व्यक्तीला त्वरित अटक करावी यासाठी रांची क्रिकेटर्सनी निदर्शने सुरु केली होती.

या व्यक्तीची माहिती गुजराथ पोलिसांना कळविली गेल्यावर त्यांनी संबंधित मुलाला अटक केली. या मुलाने धमकीचा मजकूर पोस्ट केल्याची कबुली दिली असून त्याला आता झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. दरम्यान धोनीच्या फार्महाउस भागात सुरक्षा रक्षकांच्या शिवाय जादा पोलीस तैनात केले गेले होते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवली जात होती असेही समजते.