फोटो जर्नालिस्ट

सध्या माध्यमांचे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे पत्रकारितेत तरुणवर्गाला फार चांगली संधी निर्माण झालेली आहे. आजवर पत्रकारितेकडे विद्यार्थ्याचे दुर्लक्ष होते. परंतु अनेक तरुण टी.व्ही.वर झळकायला लागले, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे वळले. परंतु गेल्या दहा वर्षात ज्या वेगाने माध्यमांचा विकास झाला त्या वेगाने नवे पत्रकार निर्माण झाले नाहीत. त्यामुळे पत्रकारितेच्या विविध क्षेत्रांमध्ये कुशल कामगारांची आणि पत्रकारांची चणचण जाणवत आहे. त्यातलाच एक म्हणजे फोटो जर्नालिस्ट.

फोटो जर्नालिझम या विषयावर लोकांचे काही गैरसमज आहेत. एखादा बातमीदार बातमी संकलित करण्यासाठी घटनास्थळावर जातो, तेव्हा तो त्या घटनेची माहिती गोळा करतो. परंतु ती माहिती अधिक उठावदार करण्यासाठी काही फोटो घेणे आवश्यक असते. स्वत: बातमीदार फोटो घेऊ शकत नाही, त्यामुळे त्याच्या सोबत एक फोटोग्राफर असतो तोच फोटो जर्नालिस्ट असे समजले जाते. मुद्रित माध्यमांमध्ये बातमीला उठाव येण्यासाठी जसा फोटो आवश्यक असतो तसेच वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांना उठाव येण्यासाठी व्हिडिओ क्लिप आवश्यक असते. त्यामुळे तिथे फोटो जर्नालिस्टची भूमिका व्हिडिओग्राफर वटवत असतो आणि तोच फोटो जर्नालिस्ट समजला जातो. पण फोटो जर्नालिझम म्हणजे बातमीला उठाव देणारे फोटो काढणे नव्हे, तर बातमी स्पष्ट करणारा फोटो काढणे. हे जरा समजून घेण्याची गरज आहे. काही वेळा बातमीदार बातमी सांगतच नाही. फोटोग्राफर केवळ फोटोमधून पूर्ण बातमी सांगतो. शब्दाविना बातमी सांगण्याची ही कला म्हणजेच फोटो जर्नालिझम.

जर्नालिझमचे शिक्षण देणार्‍या संस्था अनेक आहेत आणि तिथे बातम्यांना उठाव देणारे फोटो आणि व्हिडिओ क्लिप कसे तयार करावे याचे शिक्षण दिलेही जाते, परंतु ज्याला खर्‍या अर्थाने फोटो जर्नालिझम म्हणता येईल असे शिक्षण देणार्‍या संस्था फार कमी आहेत. ज्याला खरोखर फोटो जर्नालिस्ट व्हायचे असेल त्याने या संस्थांमध्ये तीन वर्षांचे केवळ फोटो जर्नालिझमचे शिक्षण घेतले पाहिजे. मात्र अशा विद्यार्थ्याला बातमी आणि फोटोग्राफी या दोन्हींचेही सखोल ज्ञान असण्याची गरज असते आणि या दोन्हींचेही मुळातून शिक्षण देण्याची सोय अशा संस्थांमध्ये केलेली असते. भारतामध्ये अशा संस्था नाहीतच. मात्र क्यूबा आणि झेकोस्लोवाकियामध्ये त्या आहेत. या दोन देशातील फोटो जर्नालिझमचे कोर्स सहा-सहा वर्षांचे आहेत. त्यातील पहिल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांना ललित कला, मानव्यशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र यांचे शिक्षण दिले जाते. नंतरच्या दोन वर्षात फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण दिले जाते आणि नंतर दोन्हींचा मिलाप करून एक चांगला फोटो जर्नालिस्ट म्हणून कसे काम करावे याचे प्रशिक्षण दिले जाते. भारतामध्ये पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण देणार्‍या अनेक शिक्षण संस्था निघालेल्या आहेत. परंतु त्या संस्थांमध्ये या अर्थाने फोटो जर्नालिझम एवढ्या तपशीलात शिकवला जात नाही. पदव्युत्तर वर्गाच्या शेवटच्या सत्रामध्ये या विषयाला वाहिलेला एखादा पेपर असू शकतो. मात्र विद्यार्थ्यांनी फोटोग्राफी आणि पत्रकारिता या दोन्हींचाही सखोल अभ्यास केला तर तो फोटो जर्नालिस्ट होऊ शकतो.

Leave a Comment