पुन्हा क्ले कोर्टाचा बादशहा ठरला राफाल नदाल

स्पेनचा टेनिस स्टार राफाल नदाल याने त्याचे किंग ऑफ क्ले कोर्ट हे बिरूद सार्थ असल्याचे सिद्ध केले आहे. रविवारी फ्रेंच ओपन स्पर्धत त्याने सर्बियाई खेळाडू नोवाक जोकोविच याचा सलग तीन सेट मध्ये पराभव करून रेकॉर्ड तेरावा खिताब जिंकला. त्याचबरोबर त्याने २० वे ग्रँड स्लॅम जिंकून स्विझर्लंडचा टेनिस धुरंदर रोजर फेडरर याच्याशी बरोबरी केली आहे.

रविवारच्या या सामन्यात नदालने जोकोविचचा ६-०, ६-२, ७-५ असा सरळ तीन सेट मध्ये पराभव केला. २ तास १४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोविच फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तिसऱ्या सेट मध्ये जोकोविचने बऱ्यापैकी प्रतिकार केला पण नदालने पुन्हा खेळावर वर्चस्व मिळवून सेट जिंकला.

आता ग्रँड स्लॅम मध्ये पुरुष वर्गात नदाल आणि रोजर फेडरर हे दोघेही २०-२० विजेतेपदे मिळवून बरोबरीत आहेत. तर जोकोविचचा नव्या वर्षात हा पाहिला पराभव आहे. यापूर्वी युएस ओपन स्पर्धेतून अंपायरशी झालेल्या वादामुळे जोकोविचला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. जोकोविच याने आत्तापर्यंत १७ ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत.