घर खरेदी करताना घ्या खबरदारी

एकेकाळी घरखरेदी ही निवृत्तीनंतर करावयाची खरेदी होती. आयुष्यभर कष्ट करून पै पै जमवायची आणि आयुष्याच्या अखेरी एखाद्या गावात मनासारखे घर किंवा बंगला बांधायचा आणि अखेरचा काळ व्यतीत करायचा हा अगदी आत्ताआत्तापर्यंतचा फंडा होता. मात्र आता सारे जीवनमानच बदलले आहे. आजच्या तरूणांना लग्न करण्याअगोदर स्वतःचे घर किवा फ्लॅट घेण्याची इच्छा असते आणि त्यामुळे अगदी तरूणवयातच घरखरेदी केली जाते. मात्र घर खरेदी करताना कर्ज घेऊनच बरेचवेळा ही खरेदी होत असते आणि त्यामुळे ती योग्य रितीने होणे फार महत्त्वाचे असते. कुठेही घर खरेदी करताना काय काय गोष्टी जाणून घ्यायला हव्यात यासाठी तज्ञांच्या सूचना नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतात जेणे करून फसवणूक होण्यापासून बचाव होऊ शकतो.

घरासाठी करावयाची गुंतवणूक सुरक्षित होण्यासाठी कांही बँक अधिकारी आणि प्रॉपर्टी कन्सल्टंट यांची सुचविलेले कांही मार्ग असे-
 कोणत्याही प्रकल्पातून घर खरेदी करताना घराचा (फलॅट असो वा बंगला) कार्पेट एरिया आणि सुपर एरिया यांच्याबाबत खुलासा करून घेणे आवश्यक असते. रियल इस्टेट एजन्सी किवा एजंटकडून ही खरेदी होणार असेल तर नेहमी सुपर एरिया धरूनच किंमत ठरविलेली असते. सुपर एरियापेक्षा प्रत्यक्षात आपल्याला मिळणारी जागा म्हणजे कार्पेट एरिया नेहमीच कमी असतो. हे प्रमाण साधारणपणे १०० ला ८० असे असते. म्हणजे १०० स्क्वे.फूट सुपर एरिया हा प्रत्यक्षात ८० स्क्वे.फूटच भरतो. आजकाल तर हे प्रमाण १०० ला ७० असे झाले आहे. सुपर एरियामध्ये जिन्यातील जागा, घराबाहेरचा कॉमन पॅसेज, लिफ्ट, घराच्या बाहेरच्या भितींपासून एरिया मोजणे असे प्रकार असतात. मात्र किंमत आकारताना या सर्व एरियासाठीची आकारली जाते.

दुसरा प्रकार असतो तो सँपल फ्लॅट रेडी म्हणून जाहिरात करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांचा. ग्राहकाला आकर्षून घेणे हे त्यातले मुख्य उदिष्ट्य असते. यात महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट अशी की सँपल फ्लॅट पाहून आपण घर खरेदी करायचा निर्णय घेऊ नये. कारण दाखविण्याचे दात आणि खायचे दात वेगळे असतात हे लक्षात घेतले पाहिजे. या सँपल फ्लॅटचे सिलिंग प्रत्यक्षातील फ्लॅटपेक्षा उंच असते. तेथे साठवणाची जागा अधिक दाखविलेली असते. फॉल्स सिलिंग, लाईटस, पडदे, फर्निचर यामुळे हे घर दिसायला देखणे असतेच पण बाथरूम ग्लास पार्टिशन, महागड्या टाईल्स, महागडी बाथरूम फिटिंग्ज, मॉड्युलर किचन यामुळे ते अधिक आकर्षकही बनविले जाते. प्रत्यक्षात घर घेताना या सोयींसह ते मिळत नसते तर या सोयी हव्या असतील तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत असतात. अशा प्रकल्पातून घर घेताना या गोष्टींचा खुलासा जसा करून घ्यायला हवा तसेच दारांसाठी कोणते लाकूड वापरले जाणार, माळ्यांची रूंदी किती असेल याचीही चौकशी करून घ्यावी.

बांधकाम सुरू होण्याअगोदर बुकींग शक्यतो करू नये. करायचे असेलच तर बिल्डरकडे आवश्यक त्या सर्व परवानग्य आहेत का याची खातरजमा करायला हवी.जागा वापर परवाना, ना हरकत प्रमाणपत्र, इलेट्रिक , वॉटर बोर्डांच्या परवानग्या, स्थानिक नोंदण्या, कांही विशिष्ठ भागात लष्करी परवानग्याही आवश्यक असतात. या सर्व परवानग्या पाहण्यासाठी मागण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. आपण त्यांची खातरजमा आपल्या विश्वासाच्या वकीलांकडूनही करून घ्यावी. ऊंच इमारतींसाठी विशेष परवानग्या आवश्यक असतात हे लक्षात ठेवावे.

जेथे बांधकाम सुरू आहे आणि कांही जागांचे बुकींग झाले आहे तेथे जागा घेणे कमी धोकादायक असते. या प्रकल्पातून जागा घेणार्‍यांनी बँका अथवा गृहकर्जे देणार्‍या संस्थांकडून कर्ज घेतलेले असेल तर तेथे जागा घेण्यात कमी धोका असतो हे लक्षात ठेवावे.

घर ताब्यात मिळण्याची मुदत हा नेहमीच ट्रिकी मुद्दा असतो. ताबा मिळणे प्रत्यक्षात अनेक बाबींवर अवलंबून असते. कांही वेळा बांधकाम व्यावसायिकाला पैसा वेळेत न मिळणे, फ्लॅटसची विक्री न होणे, कच्च्या मालांच्या किमतींतील बदल अगदी कांहीवेळा तर खूप पाऊस यामुळेही वेळेत ताबा देणे शक्य होत नाही. सर्वसाधारणपणे हे मुद्दे लक्षात घेऊनच ताब्याची तारीख दिली जात असते मात्र तसा उल्लेख आपल्या करारनाम्यात असणे आवश्यक आहे. सही करण्यापूर्वीच वेळेत पझेशन मिळाले नाही तर बिल्डरकडून पेनल्टी मिळण्याचा मुद्दा त्यात स्पष्ट करून घ्यावा आणि ग्राहक बिल्डर आणि कर्ज देणारी बँक यांच्या करारनाम्यात त्याचा अवश्य उल्लेख असावा.

2 thoughts on “घर खरेदी करताना घ्या खबरदारी”

  1. खुब आवडल मआ. हा वेब्सित महिला शस्तिकरन साठी आहेस, जरूर पाहा – zeemarathijagruti.com

  2. नमस्कार…. माझी ग्रांमपंचायत हद्दी मध्ये जागा आहे , तर त्याजागे मध्ये मला घर बांधण्यासाठी कर्ज मिळेल का ?? मिळु शकते तर कोणत्या बँकेकडुन ????

Leave a Comment