इराणी चलन रियालची ऐतिहासिक घसरण

अमेरिकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणी चलन रियालची सतत घसरण होत चालली असल्याचे दिसून येत आहे. तेहरानच्या अनधिकृत बाजारात रविवारी एक अमेरिकन डॉलरसाठी ३,१५ हजार रियाल मोजावे लागल्याचे वृत्त आले आहे. रियालची ही सर्वाधिक घसरण असल्याचे समजते.

२०१५ मध्ये शक्तिशाली देशांसह अणु करार केल्यावर रियालचे दर घसरण्यास सुरवात झाली होती. या काळात एक डॉलरला ३२ हजार रियाल असा दर होता. आजही सरकारी दर एक डॉलरला ४२ हजार रियाल असा असला तरी हा दर प्रामुख्याने सरकारी अनुदानातून मिळणारे अन्नधान्य, औषधे आयात करण्यासाठीचा आहे. गेल्या एक महिन्यात रियाल प्रती डॉलर २,६२ हजार वरून ३,१५ हजार पातळीवर गेला आहे.

इराण अमेरिका संघर्ष पेटल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये इराण अमेरिका यांच्यामध्ये झालेला २०१५ चा सामंजस्य करार एकतर्फी मोडीत काढला. आणि इराणवर आर्थिक निर्बंध लादले. काही दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने १८ इराणी बँका ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्या आणि या बँकांशी व्यवहार करणाऱ्या अन्य देशांच्या बँकांना दंड करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने इराणला जागतिक अर्थव्यवस्थेतून पूर्ण बाहेर काढण्याचा चंग बांधला आहे.