‘स्वामित्व’ योजनेमुळे संपुष्टात येणार ग्रामीण भागातील संघर्ष: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: आपल्या हक्काच्या मालमत्तेचे दस्तावेज सुलभपणे सुपूर्त करणारी ‘स्वामित्व’ योजना ऐतिकासिक असून त्यामुळे ग्रामीण भागातील संघर्ष संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडून येतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या जागांचे दस्तावेज प्रदान करणाऱ्या ‘स्वामित्व’ योजनेचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील १ लाख मालमत्तांचे मालक आपल्या मालमत्तेचे कार्ड मोबाईल फोनवर एसएमएस लिंकद्वारे डाऊनलोड करू शकणार आहेत. त्यानंतर राज्य शासनाच्या मार्फत प्रत्यक्ष कार्ड त्यांना देण्यात येईल.

लोकनायक जयप्रकाश नारायण आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. या दोन आदरणीय व्यक्तिमत्वाचा जन्मदिन एकाच दिवशी आहे एवढेच त्यांच्यातील साम्य नाही. त्यांचा संघर्ष आणि आदर्शही सामान आहे, असे पंतप्रधान यांनी नमूद केले.

‘स्वामित्व’ योजनेमुळे ग्रामीण भागातील मालमत्ताधारक आपल्या मालमत्तेचा उपयोग बँकांमधून कर्ज घेण्यासारख्या आर्थिक सुविधांसाठी करू शकतील. मालमत्तांवरून होणारे संघर्ष संपून ग्रामीण जनता स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा उत्कर्ष साधू शकेल, असेही मोदी म्हणाले.