चीनच्या मदतीने करणार कलम ३७० चे पुनरुज्जीवन: फारुख अब्दुल्लांची मुक्ताफळे

नवी दिल्ली: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनचे आक्रमक धोरण हा काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम ३७० रद्द करण्याचा परिणाम आहे. चीनच्या मदतीने कलम ३७० चे पुनरुज्जीवन करून काश्मीरला पुन्हा स्वायत्तता मिळवून देऊ, अशी मुक्ताफळे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काढली.

काश्मीरची स्वायत्तता काढून घेणे हे कदापि स्वीकारले जाणार नाही. चीनलाही हे कृत्य न आवडल्याने त्यांनी नियंत्रण रेषेवर दबाव वाढविला आहे. काश्मीरला पुन्हा स्वायत्तता प्रदान करण्यासाठी चीनचे सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

चीनच्या अध्यक्षांना आपण पाचारण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांना आमंत्रण दिले. त्यांच्याबरोबर झुले झुलविले. त्यांना चेन्नईला नेऊन त्यांच्याबरोबर मेजवानीही केली, असे अब्दुल्ला म्हणाले.

काश्मीरची स्वायत्तता काढून घेणे हे कधीही सहन केले जाणार नाही. या विषयावर आपल्याला संसदेत एक शब्दही बोलू दिला नाही, असा आरोपही त्यांनी केला.