‘… हेच का यांचे रामराज्य?’ विरोधकांचा योगी सरकारवर हल्लाबोल

लखनौ: राज्यात सत्ताधारी आणि भूमाफीया यांची अभद्र युती झाली असून सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. ‘हेच आहे का त्यांचे रामराज्य,’ असा सवाल काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला केला आहे.

गोंडा येथे राम जानकी मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यामागे भूमाफियांचा हात असल्याचा आरोप होत आहे. या घटनेवरून विरोधकांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने सरकारची भूमाफियांबरोबर हातमिळवणी असल्याचा आरोप केला आहे तर, समाजवादी पक्षाने साधू संत आणि पुजाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असल्याकडे लक्ष वेधले आहे. याबाबत सरकार मूग गिळून गप्प असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू यांनी तर ट्विट करून मुख्यमंत्री असंवेदनशील असल्याचा आरोप केला आहे. सरकार निष्क्रिय आहे आणि मुख्यमंत्री बोलघेवडे, अशा शब्दात टीका करतानाच त्यांनी ज्या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, तेच का रामराज्य, असा सवालही त्यांनी केला आहे.

मागील काही दिवसात राज्यात तब्बल २० साधुसंत आणि पुजाऱ्यांची हत्या करण्यात आली. काही प्रकरणात तर पोलिसांनी हत्येला आत्महत्या ठरवून फाईल बंद करून टाकली आहे, असे प्रदेश काँग्रेसच्या ट्विटरवरून करण्यात आला आहे