माणसांकडून प्राण्यांना करोनाचा संसर्ग?अमेरिकेत १० हजार प्राणी मरण पावले

वॊशिंग्टन: करोनाचा विषाणू प्राण्यांमधून माणसांमध्ये आल्याचे महासाथीच्या सुरुवातीला सांगितले जात होते. सध्या मात्र माणसांकडून पाळीव प्राण्यांमध्ये हा विषाणू पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. उटाह आणि विस्कॉनसिंग येथील ‘मिंक फार्म’मधील तब्बल १० हजार प्राणी करोनामुळे मरण पावले आहेत. त्यांच्यामध्ये हा विषाणू माणसांकडून पोहोचला आहे.

मिंक हा प्राणी लोकरीसाठी प्रसिद्ध आहे. उटाहमधील मिंक फार्ममध्ये प्राण्यांना संसर्ग झाल्याचे ऑगस्टमध्ये लक्षात आले. त्यापूर्वी जुलै वाहिन्यांत फार्ममधील कर्मचारी कोविड १९ मुळे आजारी पडले होते, असे शासकीय पशुवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डीन टेलर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून प्राण्यांमध्ये करोनाचा संसर्ग माणसांपासून झाल्याचे दिसून येत आहे. या बाबतीत अधिक संशोधन सुरू आहे, असेही ते म्हणाले.

उटाह येथे ८ हजार तर विस्कॉन्सिन येथे २ हजार मिंक करोनामुळे अरं पावले आहेत. स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणचे मिंक फार्म प्रतिबंधित केले आहेत. नेदरलँड, डेन्मार्क आणि स्पेन येथेही माणसाकडून प्राण्यांमध्ये संसर्ग झाल्याचे प्रकार आढळून आले आहेत.

मानवाकडून प्राण्यांमध्ये करोनाचा संसर्ग होत असल्याच्या अमेरिकन कृषी विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पशुवैद्यक प्रयोगशाळेनेही दुजोरा दिला आहे. आतापर्यंत कुत्रे, मांजरे, वाघ आणि सिंह अशा प्राण्यांना मानवाकडून संसर्ग झाल्याचा प्रयोगशाळेचा दावा आहे. जून महिन्यात मिंकमार्फत माणसांमध्ये करोना फैलाविण्याच्या भीतीने नेदरलँडमध्ये मिंक फार्ममधील कर्मचाऱ्यांनी १० हजार मादी मिंक आणि ५० हजार पिल्लांना गॅस सोडून ठार केले आहे.