टीआरपी’ घोटाळा प्रकरणी एकाला अटक

मुंबई: अवास्तव दर्शकसंख्या दाखविण्याच्या ‘टीआरपी’ घोडताळ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोमापल्लीराव मिस्त्री (वय ४५) याला अटक केली आहे. या घोटाळ्यात त्याला मागील वर्षभरात तब्बल १ कोटी रुपये मिळाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.

दीड वर्षांपासून उत्पन्नाचा कोणताही नियमित स्रोत नसताना मिस्त्री याच्या बँक खात्यात चार व्यक्तींकडून साधारणतः दर दोन महिन्यांनी २० लाख रुपये नियमितपणे भरले गेल्याचे तपासात आढळून आले आहे. तीन दूरचित्रवाणी वाहिन्या बघण्यासाठी ही रक्कम देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्या लॉकरमधून साडेआठ लाखाची रोकड हस्तगत केली असून त्याचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. या खात्यात २० लाख रुपये जमा आहेत.

मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून दार दोन महिन्यांच्या अंतराने मिस्त्रीच्या बँक खात्यावर २० ते २५ लाख रुपये भरले गेल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे पाच ते सहा वेळा मिस्त्रीला पैसे देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.