आज शासकीय इतमामात रामविलास पासवान यांच्यावर अंत्यसंस्कार


पाटणा : आज शासकीय इतमामात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असून पाटण्यात होणाऱ्या या अंत्यसंस्कारावेळी केंद्रीय कायदा आणि विधि मंत्री रविशंकर प्रसाद हे केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता पासवान यांचे पार्थिव त्यांच्या पाटण्यातील निवासस्थान कृष्णा पुरी वरुन जनार्दन घाट (दीघा) येथे आणले जाईल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले होते.

शुक्रवारी रात्री पाटण्याला रामविलास पासवान यांचे पार्थिव शरीर नेण्यात आले. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. पासवान यांना पाटण्यातील विधानसभा आणि पार्टी ऑफिसमध्ये श्रद्धांजली अर्पित केली गेली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी पुष्प अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीतील एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये 74 व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.