मराठमोळ्या श्रीकांत दातार यांना राज ठाकरेंच्या ‘मनसे’ शुभेच्छा


मुंबई – भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरियाची श्रीकांत दातार हे 1 जानेवारी रोजी जागा घेतील. जगातील मराठीजनांना आणि मला दातार यांच्या नियुक्तीने अत्यानंद झाला असून ही अभिमानाची बाब असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर असेच दिमाखात मराठी पाऊल पुढे पडत राहो, मनापासून आपले अभिनंदन, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. परदेशात, विशेषत: हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी देशातील असंख्य मराठी तरुण धडपडत आहेत. त्यावेळी, या विद्यापीठाचे प्रमुख मराठी माणूस असणे, याशिवाय अभिमानाची बाब दुसरी काय असणार..


औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. आपले अनेक मराठी तरुण-तरुणी आज मराठी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा, असे राज यांनी ट्विटवरुन लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

तब्बल 112 वर्षे जुने असे हार्वर्ड बिझनेस स्कूल असून या संस्थेचे श्रीकांत दातार हे सलग दुसरे भारतीय वंशाचे डीन असणार आहेत. तर, ते हार्वर्ड बिझनेस स्कुलचे 11 वे डीन असणार अशी माहिती हार्वर्ड विद्यापीठाचे अध्यक्ष लॅरी बोको यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन श्रीकांत दातार यांचा फोटो शेअर करत एक पत्रही लिहिले आहे. आपल्या निवडीने मला व तमाम मराठीजनांना अत्यानंद झाल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.