मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर छगन भुजबळ नाराज?


मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यावरुन नाराज असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर त्यांनी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने त्यावर जास्त चर्चा करता येणार नसल्याचे म्हटले आहे. काही जणांचे परीक्षा वेळेत झाली पाहिजे, असेही मत होते हे त्यांनी यावेळी नमूद केले. परीक्षा रद्द करू नये, हे माझे वैयक्तिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यामुळे त्याच्यावर जास्त चर्चा करता येणार नाही. पण यावर दोन्ही बाजू होत्या हे नक्की आहे. परीक्षा झाल्या पाहिजेत असे काही लोकांचे तर काहींचे परीक्षा होता कामा नये, असे मत होते. मी माझे वैयक्तिक मत सांगितले होते की, मुले तयारी करत असतात. तसेच या परीक्षांसाठी मराठा कुणबी, कुणबी मराठा या माध्यमातूनही ओबीसी समाजाची मुले येत असतात. पण मुख्यमंत्र्यांनी काल कोविडची समस्या, परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी याचा विचार केला आहे आणि परीक्षा पुढे ढकलल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मराठा आरक्षणाच्या विरोधात आम्ही नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करणे आवश्यक आहे. परीक्षा जेवढ्या पुढे ढकलू तेवढे वय निघून जाईल. ज्यांना नोकऱ्या मिळू शकतात, त्यांना आपण का अडवत आहोत. भरतीच्या आड कोणी यावे असे मला वाटत नसल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.