मोठा निर्णय; रेल्वे सुटण्याच्या पाच मिनिटे अगोदर रद्द किंवा बुक करु शकता तिकीट


नवी दिल्ली – आजपासून (१० ऑक्टोबर) तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये भारतीय रेल्वेने मोठा बदल केला असून आता रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकामधून रेल्वे सुटण्याच्या पाच मिनिटे अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे. ज्या विशेष रेल्वे आजपासून सुरू होत आहेत, त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू असणार आहे.

तसेच, आता रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ३० मिनिटे आधी तिकीट बुकींगचा दुसरा चार्ट जाहीर केला जाणार आहे. दुसरा बुकींग चार्ट स्थानकांमधून रेल्वेंच्या ठरलेल्या निघण्याच्या वेळेच्या अर्धातास अगोदर तयार करण्याच्या मागील प्रणालीस आजपासून (१० ऑक्टोबर) लागू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे मागील काही दिवसांत हा कालावधी रेल्वे निघण्याच्या दोन तास अगोदर असा केला गेला होता.

याबाबत माहिती देताना रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाच्या अगोदर पहिला बुकींग चार्ट नियमांनुसार रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ठरलेल्या वेळेच्या किमान चार तास अगोदर तयार केला जात होता. जेणेकरून उपलब्ध असलेल्या जागा दुसरा बुकींग चार्ट तयार होईपर्यंत, अगोदर या जागा मिळवा या आधारावर पीआरएस काउंटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून बुक करता येतील.