केवळ फुंकर मारून होणार करोनाची टेस्ट

भारत आणि इस्रायल यांच्या सहयोगाने अक्षरशः एक मिनिटाच्या आत करोनाची बाधा आहे की नाही याचे निदान करणारे तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. यात एका टेस्टट्यूब मध्ये ज्याची करोना टेस्ट करायची आहे त्याने फक्त जोराने फुंकर मारायची आहे. ३० सेकंड ते १ मिनिट या काळात याचे निदान या टेस्ट मधून होऊ शकणार आहे. हे तंत्रज्ञान जवळजवळ तयार झाले असून लवकरच वापरात आणले जात असल्याचे इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच सांगितले.

माल्का म्हणाले, भारत आणि इस्रायल यांनी परस्पर सहयोगातून करोना चाचणीच्या चार पद्धती विकसित केल्या आहेत. तोंडाने फुकर मारून करावयाच्या चाचणीला सुपर रॅपिड टेस्ट असे म्हटले जाईल. आगामी काळात भारत इस्रायल मध्ये परस्पर सहकार्यात आरोग्य क्षेत्र हे महत्वाचे क्षेत्र असेल असेही संकेत यांनी दिले आहेत.

सुपर रॅपिड टेस्ट मध्ये करोना बाधा आहे का नाही हे एक मिनिटात कळणार आहे. याचे सॅम्पल तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवावे लागणार नाही. यामुळे ही सर्व जगासाठी चांगली बातमी म्हणता येईल असे सांगून माल्का म्हणाले विमानतळ वा अन्य सार्वजनिक ठिकाणी या टेस्टचा वापर करता येईल. त्यासाठी जास्त खर्च येणार नाही.

यापूर्वी भारत इस्रायल यांनी संयुक्त स्वरुपात चार चाचण्या विकसित केल्या आहेत. त्याच्या भारतात मोठ्या प्रमाणावर ट्रायल झाल्या आहेत. यात ब्रेथ अॅनालायझर, व्हॉइस टेस्ट यांचाही समावेश आहे. करोना लस संदर्भात बोलताना माल्का म्हणाले, आम्ही आमचे संशोधन तंत्र भारताबरोबर शेअर करत आहोत. करोना लसीसाठी भारत हब बनू शकते कारण येथील सुविधा सर्वोत्तम आहेत. करोनावर विश्वसनीय, सुरक्षित व प्रभावी लस मिळाली तर त्याचे भारतातच जादा उत्पादन केले जाईल. इस्रायलची या बाबतीतील गरज भारत पूर्ण करेल.