अंडरवॉटर पोस्ट ऑफिस पाहिलेत?

फोटो साभार डेली एक्सप्रेस

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो त्यानुसार तो काल जगात विविध ठिकाणी साजरा झाला. स्वित्झर्लंडच्या बर्नमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनची स्थापना १८७४ मध्ये झाली असली तरी जागतिक पोस्ट दिवस साजरा करण्याची सुरवात १९६९ पासून झाली असे इतिहास सांगतो.

आजच्या अतिवेगवान संदेशवहन सुविधेमुळे पोस्ट विभाग थोडा इतिहास जमा होऊ लागला असला तरी आजही अनेकजण आवर्जून पोस्टाने पत्र पाठविण्यावर भर देताना दिसतात. पोस्टाच्या, टपालाच्या अनेक आठवणी आजही मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. पोस्ट कार्यालयांचा विस्तार बहुतेक सर्व देशातून अगदी खेडोपाडी सुद्धा झालेला दिसतो. त्यातील काही पोस्ट ऑफिस खास म्हणजे वैशिष्टपूर्ण आहेत.

आज जगातील १४२ देशात पोस्टल कोड आहे. पोस्टाची सेवा सुरु झाली तेव्हा पोस्ट ऑफिसच्या इमारती एखाद्या पर्यटन स्थळांपैकी एक वाटत असत. आज रिपब्लिक ऑफ वानुअतू मध्ये असेच एक पोस्टऑफिस जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनून राहिले आहे. हे पोस्टऑफिस चक्क जमिनीच्या पातळीपासून खाली चक्क समुद्रात आहे. हे पोस्ट ऑफिस पाण्यात असल्याने पत्रे खराब होऊ नयेत म्हणून वॉटरप्रूफ केले गेले आहे. पाण्याखाली असूनही येथील टपाल पेटी काही दिवसात पूर्ण भरते. येथील सरकारने या पोस्ट ऑफिस मध्ये पत्रे पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ती अॅडव्हेंचर अॅक्टीव्हीटी म्हणून जाहीर केली आहे. त्यामुळे येथे स्कुबा डायविंग करून पत्रे पोस्ट केली जातात.

आपल्या काश्मीरच्या दल लेकमध्ये सुद्धा असेच एक तरंगते पोस्ट ऑफिस आहे. पूर्वी त्याचे नाव नेहरू पोस्ट ऑफिस होते ते २०१४ मध्ये बदलून फ्लोटिंग पोस्ट ऑफिस असे केले गेले आहे. जगातील सुंदर पोस्ट ऑफिसचा मान व्हिएतनामच्या हो ची मीन शहरातील साईगोन सेंट्रल पोस्ट ऑफिसला मिळाला आहे. हे पोस्ट पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येथे भेट देतात.