रिझ्युमबाबत सावध रहा

नोकरी मिळवताना आपण कंपनीला जो रिझ्युम सादर करतो त्यावरूनच आपल्याला नोकरी मिळणार की नाही हे ठरत असते. त्यामुळे रिझ्युम जितका चांगला तितकी नोकरी पक्की असे समजले जात असते. परंतु चांगल्या रिझ्युमवर नोकरी मिळते म्हणून रिझ्युममध्ये आपले चांगले गुण फुगवून सांगून चालत नाही आणि आपले दोष लपवूनही चालत नाही.

मात्र बर्‍याच उमेदवारांची कल्पना तशी असते. ते उमेदवार आपला रिझ्युम तयार करताना आपला अनुभव, आपले कौशल्य यांच्या बाबतीत अतिशयोक्त माहिती देतात. पूर्वीच्या काळी नोकर्‍यांमध्ये फार स्पर्धा नव्हती. तेव्हा अशा प्रकारे दडपून सादर केलेला रिझ्युम खपून जाण्याची शक्यता होती. परंतु आता मात्र कंपन्या सावध झालेल्या आहेत आणि त्या रिझ्युममध्ये दिलेल्या माहितीची खातरजमा करून घ्यायला लागल्या आहेत.

काही कंपन्यांनी तर आपल्याकडे अर्ज करणार्‍या वरिष्ठ पदावरच्या उमेदवारांची पार्श्‍वभूमी जाणून घेण्यासाठी काही विशिष्ट यंत्रणा आणि एजन्सीज् यांचीही मदत घ्यायला सुरुवात केली आहे. या यंत्रणांनी केलेल्या तपासात उमेदवाराच्या रिझ्युममधील माहिती चुकीची असल्याचे निष्पन्न झाले तर सदर उमेदवाराला नोकरी नाकारली जाते.

मात्र उमेदवाराने लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की, खोटा रिझ्युम आणि अतिशयोक्त माहिती यांचा हा दुष्परिणाम केवळ त्या नोकरीपुरताच असत नाही तर त्या उमेदवाराच्या पूर्ण करिअरभर तो जाणवत राहतो. अनेक कंपन्यांमधून या उमेदवाराचा खोटारडेपणा चर्चिला जातो आणि त्याचे कायमचे नुकसान होऊ शकते.

काही उमेदवार एक नोकरी सोडून दुसरीकडे जात असताना आपल्या पहिल्या नोकरीतल्या वेतनाची आणि अनुभवाची चुकीची माहिती देतात. कमी पगार असताना तो जास्त सांगतात. साधारणपणे सध्याच्या पगाराविषयी फार कोणी चर्चा करत नाही, कारण तो नवा पगार ठरवताना फार मोठा आधार नसतो.

मात्र आपण चुकीची माहिती देतो आणि ती उघड होते तेव्हा नोकरी देणार्‍यांच्या लेखी उमेदवाराची विश्‍वासार्हता कमी होते आणि करिअरमध्ये उमेदवाराच्या विश्‍वासार्हतेला फार महत्व असते. तीच गोष्ट अनुभवाची असते. नवी नोकरी मिळावी म्हणून काही उमेदवार आपल्याला फार मोठा अनुभव आहे असे लिहितात.

कधी कधी अनुभवाची ही वर्षे वाढवलेली असतात, तर काही वेळा ज्या कामाचा मुळात अनुभवच नाही तो असल्याचे दडपून सांगितले जाते. परंतु मुलाखत घेणारे अनुभवी लोक अशा उमेदवाराला असे काही प्रश्‍न विचारतात की, त्या दोन-तीन प्रश्‍नांच्या उत्तरातच त्याची विकेट पडते आणि रिझ्युममध्ये केलेले अनुभवाचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट होते.

अलीकडच्या काळात रिझ्युमच्या सोबत शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाची खोटी प्रमाणपत्रे देण्याचीही लाट उसळली आहे. याही गोष्टींपासून उमेदवारांनी दूर राहिले पाहिजे. गतवर्षी बिहारमध्ये शिक्षकांच्या अशा प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची एक मोहीम सुरू केली तेव्हा १५ हजार शिक्षकांनी खोटी, बनावट प्रमाणपत्रे सादर केली असल्याचे दिसून आले. परिणामी नोकरी तर गेलीच, पण कारवाईला तोंड देण्याची वेळ आली.

Leave a Comment