मनुष्यबळ व्यवस्थापन

hr

सध्याच्या काळात मनुष्यबळाचे व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे ही गोष्ट आता सर्वांच्याच लक्षात आली आहे. त्यामुळे मनुष्यबळ विकास, मनुष्यबळाचे व्यवस्थापन त्याचबरोबर प्लेसमेंट सर्व्हिससारख्या क्षेत्रात अमाप रोजगार निर्माण होत आहे. विविध व्यवसायांमध्ये माणसांची भरती करणे, त्यांची निवड करणे इथपासून मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या कार्याला सुरुवात होते. मात्र आपण निवडलेले मनुष्यबळ योग्य पद्धतीने वापरले जात आहे की नाही आणि कमीत कमी मनुष्यबळात अधिकाधिक काम करून घेतले जात आहे की नाही हे पाहणे हा मनुष्यबळ व्यवस्थापनाचाच भाग असतो. मात्र हे करताना काम करणारे मजूर आणि कामगार हे सुद्धा समाधानी आहेत की नाही हेही त्यालाच पहावे लागते. एकंदरीत मनुष्यबळाचे सर्वार्थाने व्यवस्थापन करणे आणि त्या व्यवस्थापनातून संस्थेची भरभराट करणे हे मनुष्यबळ व्यवस्थापकाचे काम असते.

मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या मोठ्या कंपन्यातील नोकर्‍या किंवा मोठ्या उद्योगातील मनुष्यबळ विभागातील नोकर्‍या या नोकरीच्या संधी या क्षेत्रातल्या तरुणांना उपलब्ध असतात. नोकरी मिळवताना काही शैक्षणिक पात्रता आवश्यक असतेच. विशेषत: सध्याच्या काळात एम.बी.ए.ची पदवी घेताना मनुष्यबळ विकास असे स्पेशलायझेशन केले जाते. तेव्हा केवळ एम.बी.ए. केलेल्या पदवीधरापेक्षा मनुष्यबळ विकासाचे स्पेशलायझेन केलेल्या पदवीधरांना या नोकर्‍यांसाठी प्राधान्य दिले जाते. असे असले तरी याच क्षेत्रात व्यवसाय करताना मात्र पदवी आवश्यक नाही.

विविध क्षेत्रातील उद्योजकांना पर्याप्त आणि योग्य नोकर मिळवून देणे आणि त्यासाठी नोकरी मागणारा आणि नोकरी मिळवणारा यांच्यातील दुवा म्हणून काम करणे हा त्याचा व्यवसाय असतो आणि या व्यवसायातील त्याचे यश त्याच्या संपर्क क्षमतेवर अवलंबून असते. विविध उद्योगांशी सतत संपर्कात राहणे आणि दुसर्‍या बाजूला नोकरी करू इच्छिणार्‍या तरुणांमध्ये स्वत:विषयी एक वेगळे स्थान निर्माण करणे यावर या व्यवस्थापकाचे यश ठरत असते. एम.बी.ए. सारख्या मोठ्या पदव्या मिळवूनच हे ज्ञान मिळेल असे काही नाही. अनेक विद्यापीठांमध्ये आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मनुष्यबळ विकास आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यांचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत. असा एखादा अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्याला मनुष्यबळाच्या एखाद्या क्षेत्रामध्ये नक्कीच यश मिळवता येऊ शकते.

Leave a Comment