बिझीनेस ऍनॅलिस्ट

आपल्या देशात ऍनॅलिस्ट हे करीयर फारच दुर्लक्षित राहिलेले आहे. मोठी विसंगती अशी की, या करीयरची गरज वाढत असतानाही ते उपेक्षित राहिलेले आहे. उद्योग व्यवसायाच्या अनेक क्षेत्रात ऍनॅलिस्टांची गरज असते. बिझीनेस ऍनॅलिस्ट, डेटा ऍनॅलिस्ट, सिस्टीम ऍनॅलिस्ट, प्रोडक्ट ऍनॅलिस्ट अशी अनेक क्षेत्रे आहेत. बिझीनेस सिस्टिम ऍनॅलिस्ट हे फारच उज्वल करीयर आहे. कारण हा ऍनॅलिस्ट विविध संस्थांतल्या संगणक प्रणालींच्या वापराचे विश्‍लेषण करीत असतो.

आपल्या देशात संगणकांचा वापर वाढत चालला आहे. पण त्यांचा वापर करणार्‍या व्यापारी संस्था, संघटना यांना संगणकांच्या वापराचे सखोल ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे संगणक प्रणाली बसवली आहे पण तिचा वापर कार्यक्षमतेने होत नाही. परिणामी तिच्यावर केलेल्या गुंतवणुकीचा म्हणावा तसा मोबदला मिळत नाही अशी अवस्था येते. अशा स्थितीत बिझीनेस सिस्टिम ऍनॅलिस्टांचे काम सुरू होते. तो त्या संस्थेतल्या संगणक प्रणालीचे टेस्टींग करतो, तिच्या वापरातले अडथळे दूर करतो, बिघाड दुरुस्त करतो आणि वेळ पडल्यास त्या संगणक प्रणालीचे क्रियान्वयन ठीक व्हावे यासाठी आवश्यक ती तंत्रकुशल माणसेही पुरवितो. असा बिझीनेस सिस्टिम ऍनॅलिस्ट होण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स किंवा इंजिनिअरींगमधील पदवी मिळवलेली असावी किंवा माहिती तंत्रज्ञानाशी निगडित एखादा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. मात्र एवढ्यावरच भागत नाही. बिझिनेस सिस्टिम ऍनॅलिस्ट म्हणून काम करण्यासाठी काही खास कौशल्ये आवश्यक आहेत. काही वेगळे ज्ञान मिळवणे गरजेचे आहे. ते ज्ञान आणि कौशल्य प्रदान करणारे अल्पावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम भारतातल्या आणि परदेशातल्या काही आय.टी. कंपन्यांतर्फे आयोजित केले जातात.

हे अभ्यासक्रम कधी कधी दोन दिवसांचे असतात तर कधी १५ दिवसांचे असतात. हे अभ्यासक्रम पूर्ण केले म्हणजे त्यांच्याकडून त्याचे प्रमाणपत्र मिळते. त्या प्रमाणपत्राला या व्यवसायात महत्व असते. काही संस्थांनी आता आता बी.ए. (बिझीनेस ऍनॅलिस्ट) असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या व्यवसायात दरमहा १० हजारापासून ३० हजारापर्यंत कमाई होऊ शकते. इच्छुकांनी इंटरनेटवर अल्पकाळच्या अभ्यासक्रमांची किंवा प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती मिळवावी.

Leave a Comment