बायोइन्फर्मेटिक्स

भारतात माहिती तंत्रज्ञानाने काय क्रांती घडवली आहे आपल्याला माहिती आहेच. दोन वर्षांपूर्वीच्या अमेरिकेतल्या मंदीचा परिणाम होऊनही या क्षेत्राने गतवर्षी ८७ अब्ज डॉलर्सची उलाढाल नोंदवली आहे. हा पैसा रुपयांत चार लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एवढी उलाढाल करणार्‍या या धंद्यात अजूनही भरपूर स्कोप आहेच पण या व्यवसायाला फुटलेल्या वाटाही आपल्याला व्यवसाय संधी म्हणून उपयोगाला पडणार्‍या आहेत. ही शाखा म्हणजे बायो  इन्फर्मेटिक्स.

ही नवी शाखा अजूनही अनेक पदवीधरांना नीट समजलेली नाही. माहिती तंत्रज्ञान सर्वांना माहीत आहे आणि हळुहळू जैवतंत्रज्ञान माहीत होत आहे. बायोइन्फर्मेटिक्स ही या जैवतंत्रज्ञानाचीच शाखा आहे. या पुढच्या काळात जैवतंत्रज्ञानाला फार महत्त्व येणार आहे कारण या तंत्रज्ञानातूनच शेतीत वापरले जाणारे बियाणे तयार केले जात आहे. संकरित बियाणांनी आपल्या शेतीत क्रांती केली आहे पण आता जैवतंत्रज्ञानावर आधारलेली क्रांती फार व्यापक आणि शेती व्यवसायाचे स्वरूप पार बदलून टाकणारी ठरणार आहे. याच तंत्रज्ञानाने औषधी व्यवसायही असाच बदलून जाणार आहे. या बदलांना जनुक अभियांत्रिकी ही या तंत्रज्ञानाची शाखा कारणीभूत आहे. या शाखेत प्राणी आणि वनस्पती यांच्या जनुकांचा आणि त्यांच्या पेशींचा किचकट अभ्यास केला जात असतो. हा अभ्यास करताना फारच गुंतागुंतीची गणिते करावी लागतात. ती गणिते करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या ज्या शाखेचा उपयोग होतो ती शाखा म्हणजे बायोइन्फर्मेटिक्स.
 
या शाखेच्या विस्ताराचा अजून प्रारंभही झालेला नाही, पण येत्या पाच दहा वर्षात बायोटेक्नालॉजी, जेनेटिकल इंजिनियरिंग, बायो  इन्फर्मेटिक्स या शास्त्रांचे महत्त्वही वाढणार आहे. त्यांच्यावर आधारलेल्या प्रयोगशाळा आणि उद्योग यांत मोठी गुंतवणूक होऊन  हजारो नोकर्‍या निर्माण होणार आहेत. त्या नोकर्‍या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नोकर्‍यांप्रमाणे भारी पगाराच्या असतील. तेव्हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात शिरकाव करण्यास आवश्यक त्या गुणवत्तेच्या तरुणांनी आतापासूनच बायोइन्फर्मेटिक्स या क्षेत्रात शिरकाव करावा.

या क्षेत्रातल्या पदव्या घेतलेल्या तरुणांना सिक्वेन्सिंग असेंब्लींग, सिक्वेन्सिंग जीन अनॅलिसिस, प्रोटिओमिक्स, फॉर्मेकोजीनोमिक्स अशा विविध कामांत मोठी मागणी आहे. विज्ञान, औषध शास्त्र (फार्मासिस्ट), अभियांत्रिकी  किवा तंत्रज्ञान या शाखांच्या पदवीधरांना बायोइन्फर्मेटिक्सच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.पुणे विद्यापीठात बायो  इन्फर्मेटिक्सचा अभ्यासक्रम सुरू आहे. त्याशिवाय बंगळूर येथे इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फर्मेटिक्स अँड अप्लाईड बायोटेक्नॉलॉजी   (आयबीएबी) या संस्थेत हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.या व्यतिरिक्त हे प्रशिक्षण देणार्‍या संस्था अशा आहेत. बायो  इन्फर्मेटिक्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोईडा, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालॉजी (आयआयटी) दिल्ली आणि युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद. या क्षेत्रात पदार्पण करणार्‍या पदवीधरांना सुरूवातीला १२ ते १५ हजार रुपये दरमहा असे वेतन मिळते. पुढे ते चांगलेच वाढू शकते.

Leave a Comment