धोनी कन्या जीवावर रेप करण्याची धमकी

एकाद्या सेलेब्रीटीचे चाहते नाराज झाले तर किती खालच्या थराला उतरू शकतात याचे एक हिडीस उदाहरण सोशल मीडियावर समोर आले आहे. युएई मध्ये सुरु असलेल्या आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यावेळी पराभव पत्करावा लागल्याने नाराज झालेल्या एका धोनी चाहत्याने चक्क माहीची पाच वर्षीय कन्या जीवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी सोशल मिडियावरून दिली आहे .चेन्नई सुपरकिंग्स ची कामगिरी यंदाच्या आयपीएल मध्ये अपेक्षेनुसार होत नसल्याने माहीला ट्रोल केले जात आहेच पण त्याची पत्नी साक्षी हिलाही शिव्याशाप दिले जात आहेत.

अर्थात या प्रकारच्या मजकुराला अन्य ट्रोलर्सनी सडेतोड उत्तर दिले आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने ट्विटरवरून माही बाबत असे वक्तव्य करणारया चाहत्याला खडसावले आहे. पठाण लिहितो, सर्व खेळाडू त्यांच्यातील चांगले ते देण्याचा प्रयत्न करत आहेतच. पण दरवेळी त्याचा उपयोग होतोच असे नाही. पण त्यामुळे छोट्या मुलाला वरील प्रकारची धमकी देण्यात अर्थ नाही.

चेन्नई सुपरकिंगने आत्तापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि त्यातील दोन सामन्यात विजय मिळविला आहे. धोनीला सोशल मिडियावरून मिळालेली धमकी म्हणजे सोशल मिडियाचा दुरुपयोग किती खालच्या पातळीवर जाऊन केला जात आहे याचे उदाहरण असल्याचे मत अनेकानी व्यक्त केले आहे.