दुग्ध व्यवसाय

mik

समाजाची आर्थिक स्थिती जशी जशी सुधारत जाते तशा त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत जातात. दूध, अंडी, मांस, भाज्या, फळे आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ यांची मागणी वाढत जाते. त्यातले दुधाची मागणी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्हींकडून वाढते. त्या प्रमाणात देशात दुग्धोत्पादन वाढले पाहिजे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समाजात डेअरी टेक्नालॉजी वाढली पाहिजे. भारतात ती वाढत आहे आणि त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही लागत आहे. ही गरज ओळखून अनेक विद्यापीठांनी डेअरी टेक्नालॉजीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

मात्र या क्षेत्राला किती महत्त्व येत आहे याची योग्य जाणीव समाजात वाढत नसल्याने या अभ्यासक्रमांकडे लोकांचा ओढा दिसत नाही. दुधाचे शास्त्र वेगळे आहे. मुळात लोकांना दूध लागते ते चहासाठी. फार तर काही लोक दूध पीत असतील. दुधाच्या अशा वापराला मर्यादा आहेत. पण दूध जादा तयार होत असेल तर ते या मर्यादांमुळे खपणे अवघड जाईल. तेच दूध ताक, दही, लस्सी, श्रीखंड, आइसस्क्रीम या सारख्या पदार्थांच्या रूपात त्यांना दिले तर ते खपेल. म्हणून डेअरी टेक्नालॉजीत तीन गोष्टींना महत्त्व असते. पहिले म्हणजे दुधाचे उत्पादन वाढवणे, दुसरे म्हणजे प्रक्रिया करणे आणि तिसरे म्हणजे विकणे. या तीन अंगांचा अभ्यास या अभ्यासक्रमांत असतो. बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांस प्रवेश घेता येईल. डेअरी टेक्नालॉजीचे पदविका अभ्यासक्रम तर आहेतच पण पदवी आणि पदव्युत्तर वर्गही आहेत. 

आपल्या नजिकच्या कृषि विद्यापीठांशी संपर्क साधल्यास पशु वैद्यकीय महाविद्यालयांचे पत्ते मिळतील. काही विद्यापीठांत याच महाविद्यालयांत डेअरी टेक्नालॉजीचेही शिक्षण दिले जाते. काही विद्यापीठांत स्वतंत्रपणे शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी अनेक आहेत. दुग्ध व्यवसाय करणार्‍या संस्थांत तर रोजगार मिळतोच पण प्रक्रिया उद्योगात प्राधान्याने नोकरी मिळते. आइसस्क्रीमच्या कारखान्यांतही नोकरी  उपलब्ध होऊ शकते. नोकर्‍यांना तोटा नाही. कारण संधी भरपूर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ कमी अशी स्थिती आहे.

संपर्कासाठी महाराष्ट्र ऍनिमल अँड फिशरी सायन्सेसयुनिव्हर्सिटी या विद्यापीठाच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील वरूड येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नालॉजी या महाविद्यालयाशी संपर्क साधावा. फोन क्रमांक ०७२३३-२४७२६८, २४८६९६
Email: dtc@mafsu.in
Website: www.mafsu.in/warud/warud_main.html .

Leave a Comment