टीआरपी म्हणजे नक्की काय आणि तो कसा ठरविला जातो?

फोटो साभार जागरण

टीव्ही चॅनल्स म्हटले की टीआरपीची चर्चा सुरु होते. टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजे टीआरपी. कोणता टीव्ही चॅनल प्रेक्षकात किती लोकप्रिय आहे ते या टीआरपीवरून ठरते. अर्थात विविध कार्यक्रमांचे टीआरपी वेगवेगळे असतात. गेले काही दिवस बोगस टीआरपीवरून जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा टीआरपी म्हणजे काय आणि तो कसा ठरविला जातो याची थोडी माहिती असणे उपयुक्त.

ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजे बीएआरसी ही संस्था अधिकृतपणे टीआरपी मोजण्याचे काम करते. मात्र सध्या या संस्थेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतात टीआरपी साठी भक्कम स्वरुपाची कायदेशीर तरतूद नाही. टीआरपी मोजताना देशातील सर्व राज्ये त्यात सामील केली जात नाहीत. त्यामुळे टीआरपीची आकडेवारी ही अंदाजे दिली जाते. त्यासाठी बीएआरसी टीआरपी साठी सँपल साईजचा आधार घेते.

भारतात टीव्हीचे कोट्यवधी प्रेक्षक असल्याने टीआरपी मोजणे हे अशक्य कोटीतील काम मानले जाते. त्यामुळे बीएआरसी विविध राज्यातील विविध शहरे तसेच ग्रामीण भागातील, विविध इन्कम गटातील लोकांना या सँपल साईजमध्ये सामील करते. त्या आधारावर त्या त्या भागात उपकरणे ठेवली जातात आणि त्यात बसविलेल्या बार ओ मीटरच्या सहाय्याने टीआरपीचा अंदाज केला जातो.

बीएआरसीने ४५ हजार घरात असे मीटर बसविले असून त्याची विभागणी १२ श्रेणीत केली आहे. त्याला न्यूएसईसी म्हटले जाते. प्रेक्षकांना प्रत्येक चॅनल व कार्यक्रमासाठी वेगळे आयडी दिले जातात. प्रेक्षक कोणते कार्यक्रम किती वेळ पाहतो हे त्यावरून मोजले जाते. या आकडेवारीचे विश्लेषण करून कोणता कार्यक्रम किती वेळ पाहिला जातो त्यावर टीआरपी ठरतो. या टीआरपीचा थेट परिणाम चॅनलच्या कमाईवर होतो. जितका टीआरपी जास्त तितक्या जास्त जाहिराती मिळतात.